मुंबई: मुंबईत गेल्या पाच सहा दिवसात मोठ्या प्रमाणावर झाडे पडल्यामुळे रस्त्यांच्या वाढत्या काँक्रीटीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र काँक्रीटीकरणामुळे झाडे पडली हा मुद्दा पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी फेटाळला आहे. झाडे पदपथावर असतात आणि रस्त्यांचे काँक्रीटीकरण हे वाहनांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर केले जाते. झाडे पडण्याच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञ संस्थांची मदत येत्या काळात घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यंदाच्या पावसाळ्यात एका आठवड्यातच मोठ्या प्रमाणावर झाडे आणि फांद्या पडल्या. तर एका आठवड्यातच तीन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांचे गांभीर्य वाढले आहे. पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामांमुळे झाडे पडल्याचे आरोप फेटाळले. आश्विनी भिडे म्हणाल्या की, दरवर्षी पावसाळ्यात वारे वाहतात. मात्र यावर्षी गेल्या चार ते पाच दिवसांपासून ताशी ५० ते ७० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात झाडांचे खूप नुकसान झाले.

दरवर्षी पावसाळ्यात किंवा वेगवेगळ्या कारणांनी झाडे पडतात. यावर्षी जेवढी वर्षभरात झाडे पडतात त्याच्या ५० टक्के झाडे ही केवळ एका दिवसात पडली. सन २०२२ मध्ये ६५५ झाडे पडली होती. सन २०२३ मध्ये ६८७, सन २०२४ मध्ये ६५३ आणि सन २०२५ मध्ये ८५५ झाडे पडली. तर सन २०२६ मध्ये आतापर्यंत ८३० इतकी झाडे पडली. ८३० पैकी ४८० झाडे खासगी क्षेत्रातील होती. जेवढी झाडे पडतात तेवढ्याच फांद्या पडतात. यंदा १ हजार २३८ इतक्या फांद्या पडल्या. त्यापैकी ७०९ या खासगी क्षेत्रातील होत्या, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईत २०१८ च्या वृक्षगणनेनुसार २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. त्यापैकी रस्त्याच्या दुतर्फा २ लाख झाडे आहेत. रस्त्यालगतची झाडे खूप धोकादायक असतात. अनेक झाडे रस्त्याच्या बाजूला पदपथावर आहेत. तसेच पाणी वाहून जाण्याच्या वाहिन्या किंवा इतर वाहिन्या रस्त्याच्या खालून गेल्या आहेत. रस्त्यांचे काँक्रिटकरण केले जाते, काही ठिकाणी पेवर ब्लॉक बसविले जातात. त्यामुळे अशा झाडांच्या मुळांना पाणी पाहोचवणे गरजेचे आहे. झाडांची मुळे दूरपर्यंत पसरलेली असतात. ती कुठपर्यंत पसरलेली असतील याचा अंदाज घेऊन तिथपर्यंत छिद्रे करून त्यावर जाळी लावून पाणी टाकता येईल का याबाबतही महानगरपालिकेचा विचार सुरू आहे. असा प्रयोग यापूर्वी मलबार हिल परिसरात करण्यात आला आहे, असेही आयुक्तांनी सांगितले. मुंबई विद्यापिठातील काही तज्ज्ञांकडून तसेच तसेच आयआयटीकडूनही झाडांची काळजी घेण्याबाबत उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील अनेक झाडे ५० ते ६० वर्ष जुनी आहेत. त्यांची मुळे खूप खोलवर गेली आहेत. यासाठी रस्ते बांधत असताना कोणती काळजी घ्यावी याबाबत आमच्या सुनिश्चित कार्यपद्धती आहेत. त्यातही तज्ज्ञांचे मत जाणून घेवून त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. जमिनीखालून विविध यंत्रणांच्या वाहिन्या गेल्या आहेत. त्यांची कामे करतानाही याबाबत काळजी घेतली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. वादळात पडलेल्या झाडांच्या मोबदल्यात कुठे आणि कोणती झाडे लावली जाणार याबाबत काही अभ्यासकांची मते घेतली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

पाणी भरण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रकल्प … मुंबईत पावसाचे पाणी भरण्याची समस्या कायमस्वरुपी सुटावी म्हणून नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड यातून निधी मिळविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी आयआयटी मुंबईच्या मदतीने सविस्तर प्रकल्प तयार केला जात आहे. पाणी भरण्याची ३०० ते ३५० ठिकाणे कमी करण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. यात नवीन पंपिंग स्टेशन्स बांधणे, असलेल्या पंपिंग स्टेशन्सची क्षमता वाढवणे, स्वयंचलित पूरप्रतिबंधक दरवाजे लावणे, पर्जन्य जल वाहिनीचे जाळे भक्कम करणे या गोष्टींचा समावेश आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

जानेवारीपासून मॅनहोलची तपासणी…. मुंबईत एक लाखाहून अधिक मनुष्य प्रवेशिका (मॅनहोल) आहेत. त्यापैकी बहुतांशी सर्व प्रवेशिकांचे जिओ टॅगिंग केले आहे. तसेच आत जाळ्याही लावल्या आहेत. मात्र तरीही अनेकदा झाकणे उघडली जातात, तुटतात. त्यामुळे अशा दुर्घटना होऊ नये, अधीच त्याची माहिती मिळावी याकरीता लवकरच मदत क्रमांक दिला जाणार आहे. तसेच जानेवारी महिन्यापासूनच मुंबईतील सर्व मॅनहोलची तपासणी केली जाणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.