मुंबई : यंदाच्या पावसाळ्यासाठी मुंबईत ५४७ पाणी उपसा पंप बसवण्यात आले असून १५ मेपासूनच हे पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. मात्र तरीही २४ जूनला पडलेल्या पावसात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे आढळून आले. गेल्यावर्षीपेक्षा पंपाची संख्याही वाढवण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने दोन वर्षांसाठी पाणी उपसा पंपाची सेवा भाडेतत्वावर घेतली असून त्याकरीता १३६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
जून महिन्यात यंदा पावसाने ओढ दिली. मात्र पहिल्याच पावसातही मुंबई शहर पाण्याखाली गेले. मुंबई महापालिकेत सत्तापालट झाल्यानंतरचा हा पहिला पावसाळा असून यंदा पाणी तुंबू नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी विशेष काळजी घेतली होती. नालेसफाई पूर्ण व्हावी याकरीता दौऱ्यांवर दौरे केले. तसेच पाण्याचा उपसा करण्यासाठी असलेल्या पाणी उपसा पंपांची संख्याही वाढवली. यंदा संपूर्ण मुंबईत ५४७ पंप बसवण्यात आले आहेत. मात्र तरीही सोमवारच्या पावसात मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले. अनेक बैठ्या वसाहतींमध्ये घरात पाणी शिरले. ५४७ पंप बसवण्याच्या प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजूरीसाठी आला होता. मात्र हा प्रस्ताव यावेळी विचारात घेण्यात आला नाही. त्यामुळे खरोखर या पंपांचा फायदा झाला की नाही याबाबतची चर्चा होऊ शकली नाही.
मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे सखल भागात दरवर्षी पावसाचे पाणी जमा होते व त्याचा निचरा होत नाही. मुंबईला चारही बाजूने समुद्राने वेढलेले असून मुंबईत पावसाचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका मुंबईला असतो. मात्र पाणी भरण्याची ठिकाणे कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत. तसेच सूक्ष्म नियोजनांतर्गत दरवर्षी विविध ठिकाणच्या पर्जन्यजलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याचेही काम केले जात आहे. तरीही मुंबईतील पाणी साचण्याची ठिकाणे कमी झालेली नाहीत. यंदा तर पावसाचे पाणी उपसण्यासाठी पालिका प्रशासनाने तब्बल ५४७ पंपांची व्यवस्था केली आहे. गेल्यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस पाऊस पडू लागला होता. त्यामुळे यंदा सावधगिरीचा उपाय म्हणून हे पंप १५ मे पासूनच कार्यान्वित करण्यात आले आहेत.
सखल भागांमध्ये जोरदार पावसाच्यावेळी साचणाऱ्या पाण्याचा जलद निचरा करण्यासाठी महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत अहोरात्र (३ सत्र) मनुष्यबळासह ५४७ उदंचन संच कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यात शहर विभागातील १४६, पूर्व उपनगरे विभागातील १७८ आणि पश्चिम उपनगरातील २२३ उदंचन संचांचा समावेश आहे. उदंचन संचांच्या कार्यावर सतत देखरेख ठेवण्यासाठी यावेळी आयओटी ही प्रणाली बसवण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे उदंचन पंपाची कार्यस्थिती, स्थान, सुरू – बंद होण्याची वेळ, कार्यरत कालावधी आणि तांत्रिक माहितीची स्वयंचलित नोंद ठेवली जाणार आहे. ही माहिती केंद्रीकृत डॅशबोर्डवर प्रत्यक्ष वेळेत उपलब्ध होणार आहे.
सर्वाधिक पंप कोणत्या भागात
कुर्ला – ६४
मालाड – ५३
वांद्रे, सांताक्रूझ पूर्व – ३६
चर्चगेट कुलाबा – ३०
कुठे मुसळधार कुठे रिपरिप
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून मुंबईत ठराविक भागात मुसळधार पाऊस पडतो तर काही भागात अगदी रिपरिप पाऊस पडत असतो. त्यामुळे पंपांचा वापरही काही ठिकाणी खूप होतो तर काही ठिकाणी अजिबात होत नाही. बुधवारी पडलेल्या पावसातही दक्षिण मुंबईतील पंपांचा फारसा वापर झाला नाही. मात्र उपनगरात पंप नऊ दहा तास सुरू होते, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
