मुंबई : पावसाळ्यात सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड होऊन रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने व्यापक उपाययोजना केल्या आहेत. ट्रॅक सर्किटमध्ये पाणी साचल्यामुळे होणारे बिघाड कमी करण्यासाठी चालू वर्षात २३९ डिजिटल ॲक्सल काउंटर (डीएसी) बसविण्यात आले आहेत. यामुळे चर्चगेट – विरार मार्गावरील सिग्नल यंत्रणेची विश्वासार्हता वाढणार असल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे.
मुंबई सेंट्रल, गोरेगाव, बोरिवली, कांदिवली, प्रभादेवी आणि भाईंदर परिसरात नव्याने डिजिटल ॲक्सल काउंटर बसविण्यात आले आहेत. यामुळे चर्चगेट – विरार विभागात एकूण ७७८ ड्युअल डिजिटल ॲक्सल काउंटर आणि ७७३ डिजिटल ॲक्सल काउंटर ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्रॅक सर्किटसोबत समांतर कार्यरत आहेत.
पूर्वपावसाळ्यात तयारीचा भाग म्हणून सर्व सिग्नल उपकरणांचे अर्थिंग तपासण्यात आले असून आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा करण्यात आल्या आहेत. अखंडित वीजपुरवठ्यासाठी आयपीएस मॉड्यूलसह वीजपुरवठा यंत्रणांची चाचणी घेण्यात आली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने दुरुस्ती करता यावी, यासाठी पॉइंट मशीन आणि इतर महत्त्वाच्या सिग्नल उपकरणांचा अतिरिक्त साठाही उपलब्ध करण्यात आला आहे. रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील केबल इन्सुलेशन चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून केबल टर्मिनेशन बॉक्सची तपासणी करून आत पाणी शिरू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सिग्नल स्थापना कक्षांमधील गळती आणि झिरपणाऱ्या पाण्याच्या समस्यांचीही संयुक्त तपासणी करून प्रतिबंधात्मक देखभाल सुरू आहे.
सिग्नल आणि ऑटोमॅटिक वॉर्निंग सिस्टम (एडब्ल्यूएस) मॅग्नेट्सना जलरोधक प्लास्टिक कव्हर बसविण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. विभागातील २,४७४ पैकी १,८६० सिग्नलवर, तर १,०२६ पैकी ७१८ एडब्ल्यूएस मॅग्नेट्सवर जलरोधक कव्हर बसविण्यात आले आहेत. याशिवाय सर्व ६३५ पॉइंट मशीनची इन्सुलेशन चाचणी पूर्ण करण्यात आली असून त्यापैकी ४७१ मशीनचे सीलिंग करण्यात आले आहे. वसई रोड आणि वांद्रे यांसारख्या पूरप्रवण भागांमध्ये यावर्षी ३६ जलरोधक पॉइंट मशीन बसविण्यात आली असून विभागात अशा मशीनची संख्या १२४ वर पोहोचली आहे.
पश्चिम रेल्वेच्या या उपाययोजनांमुळे मान्सून काळात सिग्नल यंत्रणेतील बिघाड कमी होऊन लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यास मदत होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
डिजिटल ॲक्सल काउंटर म्हणजे काय?
रेल्वे मार्गावर लोकल आहे की रेल्वे मार्ग रिकामा आहे, हे अचूकपणे ओळखण्यासाठी वापरली जाणारी आधुनिक सिग्नल प्रणाली म्हणजे डिजिटल ॲक्सल काउंटर. पाणी किंवा प्रतिकूल हवामानाचा परिणाम कमी होत असल्याने ही प्रणाली पावसाळ्यात विशेषतः उपयुक्त ठरते. त्यामुळे रेल्वेची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि वेळचे पालन सुधारण्यास मदत होते.
मान्सून काळात प्रवाशांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. डिजिटल ॲक्सल काउंटर प्रणाली हा त्याचाच महत्त्वाचा भाग असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरक्षित आणि विश्वासार्ह रेल्वे सेवा देण्याचा प्रयत्न आहे. पश्चिम रेल्वेच्या या उपक्रमामुळे पावसाळ्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड कमी होण्यास मदत होणार असून रेल्वेच्या वेळ पालनातही सुधारणा होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.
