मुंबई : मागील पाच दिवसांपासून मुंबईत विविध ठिकाणांहून पाच भारतीय अजगरांना वाचविण्यात वन्यजीवांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेला आणि वन विभागाला यश आले. यात १० फुटांपासून ते २ फुटांपर्यंत लांबीच्या अजगरांचा समावेश आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या अजगरांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

पावसाळ्यात साप नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी काही साप मानवी वस्तीत किंवा रस्त्यांवर आढळतात. मागील पाच दिवसांत मुंबईच्या विविध भागातून पाच भारतीय अजगरांचा बचाव करण्यात आला. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (ओआयपीए), अम्मा केअर फाउंडेशन (एसीएफ) आणि प्लांट ॲण्ड ॲनिमल वेल्फेअर सोसायटी – मुंबई (पॉज-मुंबई) यांच्या संयुक्त बचाव पथकाने ही मोहीम राबविली.

कळवा येथील एका घरात सुमारे ३.५ फूट लांबीचा अजगर आढळला होता, तर जेव्हीएलआर, आरे मेट्रो स्थानकाच्या रस्त्यालगत असलेल्या ढिगाऱ्यात आढलेल्या सुमारे ८ फूट लांबीच्या अजगराची माहिती अरुण इंगोले यांनी दिली. त्यानंतर त्या अजगराचा बचाव करण्यात आला. याचबरोबर पवई तलाव परिसरातील पदपथावरील सुमारे २ फूट लांबीच्या अजगराला वाचविण्यात यश आले.

या बचाव मोहिमेतील सर्वाधिक लांबीचा अजगर भांडुप येथील रामनगर परिसरात आढळला. तेथे सुमारे १० फूट लांबीच्या, तर भांडुप येथील कैलास पार्क परिसरातील सुमारे ९ फूट लांबीच्या अजगराला वाचविण्यात बचाव पथकाला यश आले. अजगरांचा बचाव केल्यानंतर वन्यजीव पशुवैद्य डॉ. मनीष पिंगळे आणि डॉ. राहुल मेश्राम यांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर, तसेच अजगरांना कोणतीही इजा झाली नसल्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर वन विभागाच्या सहकार्याने अजगरांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. गेल्या आठवड्यात मुंबईत अतिवृष्टी सदृश्य पावसाची नोंद झाली होती. त्यावेळीही अनेक सापांना पावसाचा फटका बसला होता. यातील काही सापांचा बचाव करण्यात यश आले, तर काही साप भरधाव वाहनाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. यात एक भारतीय कोब्रा प्रजातीच्या सापाचा समावेश होता.

दरम्यान, भारतीय अजगराला ‘वन्यजीव अधिनियम, १९७२’ अंतर्गत संरक्षित करण्यात आले असून हा बिनविषारी साप आहे. तसेच तो पर्यावरणातील अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे अजगर दिसल्यास घाबरून न जाता, तसेच त्याला इजा न करता त्वरित वन्यजीवांसाठी कार्य करणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांशी किंवा वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई उपनगराचे मानद वन्यजीव रक्षक, तसेच वन्यजीवांसाठी कार्य करणाऱ्या ‘एसीएफ’ आणि ‘पॉज’ संस्थेचे सुनिष कुंजु यांनी केले.