वाहन चालविताना चालक आणि त्याच्या बाजूला बसणाऱ्या प्रवाशाने सीटबेल्टचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र राज्यभरातील बहुसंख्य वाहनचालक आणि सहप्रवासी या नियमाला हरताळ फासत आहेत. महाराष्ट्रात २०२० पासून सीटबेल्टचा वापर न करणाऱ्यांविरुद्ध तब्बल २५ लाख प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये २०२० सालापासून वाढ होत आहे.

हेही वाचा >>> मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. दिगंबर शिर्के

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा नुकताच रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेत मिस्त्री मर्सिडीज जीएलसी गाडीतील मागील आसनावर बसले होते. त्यांनी सीटबेल्ट बांधला नव्हता. त्यांच्या गाडीला झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर वाहनांमधील मागील आसनांवर बसणाऱ्या प्रवाशांनाही सीटबेल्ट बांधणे बंधनकारक करण्याबाबत केंद्र सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे.सध्या वाहन चालविताना चालकाला आणि त्याच्या बाजूला बसलेल्या प्रवाशाने सीटबेल्ट बांधणे बंधनकारक आहे. तर वाहनातील मागच्या आसनावर बसलेल्या प्रवाशाला सीटबेल्टचा वापर करणे अनिवार्य नाही. सीटबेल्ट न लावल्यास १९४ (बी) १ मोटर वाहन कायद्यानुसार २०० रुपयांपर्यंत दंड आकारला जातो.

हेही वाचा >>> मुंबई : घरगुती गणपतींचे विसर्जन दादर, माहीम चौपाटीवर अधिक; गणेशभक्तांची विसर्जनासाठी गर्दी कायम

याविषयी कठोर दंड किंवा नियमावली नसल्याने सीटबेल्टचा वापर करण्यास अनेक जण टाळाटाळ करतात. महाराष्ट्रात २०२० पासून २०२२ पर्यंतच्या कालावधीत सीटबेल्ट न बांधता प्रवास केल्याबद्दल २५ लाख ६४ हजार १५९ प्रकरणांची नोंद करण्यात आल्याची माहिती, महामार्ग पोलिसांतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. जानेवारी – डिसेंबर २०२० मध्ये ७ लाख ११ हजार ७५३ प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यात नंतर खूपच वाढ झाली. २०२१ मध्ये ९ लाख २७ हजार ४९१ आणि २०२२ मध्ये ९ लाख २४ हजार ९१५ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. या तीन वर्षात ५१ कोटी रुपयांहून अधिक ई-चलान दंड आकारण्यात आला आहे. तर २९ कोटी ३४ लाख ९७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

या महामार्गावर सर्वाधिक प्रकरणे
मुंबई-पुणे द्रुतगती नवीन महामार्ग आणि जुन्या महामार्गावर वाहन चालक सीटबेल्टचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही महामार्गांवर हा नियम धुडकावल्याबद्दल मोठ्या संख्येने प्रकरणांची नोंद झाली आहे. या वर्षात साधारण ३२ हजारांहून अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे.