मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मृणालताई गोरे उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू होऊन अवघे तीन महिने होत असतानाच हा उड्डाणपूल पुन्हा एकदा वादात सापडला आहे. उड्डाणपुलावरील रस्ता अत्यंत गुळगुळीत असल्याने या पुलावरून वाहने घसरून अपघात होऊ लागले आहेत. ट्रक घसरल्यामुळे पुलाच्या बाजूचे ध्वनीरोधक पडल्याची घटना दुसऱ्यांदा घडली. तर पाऊस पडत असताना दुचाकी घसरण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

मृणालताई गोरे उड्डाणपूल सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पूल वादात सापडला होता. पुलावरील खडी आणि ओबडधोबड पृष्ठभागाबद्दल समाजमाध्यमांवर टीकेचा पाऊस पडला होता. हा उड्डाणपूल ७ जून रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर लगेचच समाजमाध्यमांवर उड्डाणपुलाच्या रस्त्याचा पृष्ठभाग वितळल्याचे, खडी उखडल्याचे, तसेच दुचाकीच्या स्टँडच्या वजनामुळे रस्त्याचा काही भाग खचल्याचे कथित चित्रफिती प्रसारित झाल्या होत्या. त्यानंतर पालिकेने पुलाचा पृष्ठभाग गुळगुळीत केला. पण हा पृष्ठभाग आता इतका गुळगुळीत झाला की यावरून वाहने घसरू लागली आहेत.

विशेषतः पावसात दुचाकीस्वारांचे वाहनावरील नियंत्रण सुटून घसरण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या आठवड्यात २८ ऑगस्ट रोजी याच उड्डाणपुलावर एका डंपरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते उड्डाणपुलाच्या कठड्याला आणि ध्वनीरोधकाला धडकले. या धडकेमुळे बॅरिअरचा काही भाग खालील एस. व्ही. रोडवर कोसळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी उड्डाणपुलाच्या याच ठिकाणी अनेक दुचाकी घसरतानाच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या. वळण घेताना किमान तीन दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याचे ध्वनिचित्रफितीत दिसत आहे. यामुळे नव्याने सुरू झालेल्या उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

कॅरमबोर्डसारखा गुळगुळीत पूल

याबाबत लोखंडवाला ओशिवरा सिटिझन्स असोसिएशनचे धवल शाह म्हणाले की, “पूल आता कॅरमबोर्डसारखा गुळगुळीत झाला आहे. त्यामुळे सोंगट्या सरकाव्या तशी वाहने घसरून पडत आहेत. वाहनांचा वेग जास्त नसला तरी वाहने घसरत आहेत. विशेषतः पाऊस पडला की ओल्या रस्त्यावर वाहने घसरत आहेत. ट्रक घसरण्याची घटना तर दुसऱ्यांदा घडली आहे. ट्रकचे एवढे वजन असते, टायर रुंद असतात. तरीही ट्रक घसरत असतील तर दुचाकीस्वारांचे नियंत्रण कसे राहील असा सवाल त्यांनी केला. पाऊस पडल्यानंतर उड्डाणपुलावरील अनेक ठिकाणी वाहने घसरत आहेत. ज्या ठिकाणी वारंवार दुचाकी घसरण्याच्या घटना घडत आहेत, तो भाग उतारावर आहे. तेथे मॅस्टिकचा पृष्ठभाग अत्यंत गुळगुळीत आहे. पाऊस पडल्यानंतर हा रस्ता आणखी निसरडा होतो, असेही धवल शाह यांनी सांगितले.

२४७ कोटींचा पूल

राम मंदिर आणि गोरेगावदरम्यानचा प्रवास जलद करण्याच्या उद्देशाने सुमारे ७५० मीटर लांबीचा हा उड्डाणपूल बांधण्यात आला. या उड्डाणपुलामुळे वाहनचालकांना एस. व्ही. रोड आणि लिंक रोडवरील वाहतूक टाळून प्रवास करता येतो. मात्र, वाहतूक कोंडीपासून दिलासा देण्याऐवजी बांधकामातील विलंब, वाढलेला खर्च आणि रस्त्याच्या गुणवत्तेबाबतच्या प्रश्नांमुळे हा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत आला आहे. या उड्डाणपुलासाठी २४७.९७ कोटी रुपये खर्च आला असून, मूळ अंदाजित १७०.८२ कोटी रुपयांच्या तुलनेत प्रकल्पाच्या खर्चात जवळपास ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जवळपास आठ वर्षांच्या विलंबानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपुलाच्या वळण भागांवर गाड्या घसरण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या भगावर १५ मिमी जाडीचे थर्मोप्लास्टिक पेंटचे पट्टे मारण्यात आले आहेत. त्याने अवरोध निर्माण होतो आणि वाहने घसरण्याची शक्यता राहणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. पुलाच्या एकूण चार उतारांपैकी ज्यावर गाड्या घसरण्याच्या तक्रारी होत्या तो एक भाग पूर्ण झाला आहे. तर दुसरा वळण भाग मंगळवारी रात्री पूर्ण होईल आणि इतर २ वळण भाग येत्या ४-५ दिवसांत पूर्ण होतील, असेही ते म्हणाले.