मुंबई : महाराष्ट्र सेवा संघातर्फे ११ व १२ जुलै रोजी मुलुंडमध्ये २३ वे ‘गिरिमित्र संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. यावर्षीचे संमेलन ‘युद्धभूमीवरील गिर्यारोहण’ संकल्पनेवर बेतले आहे. यंदा पारंपरिक छायाचित्रण आणि ब्लॉग स्पर्धांसोबतच ‘रील्स स्पर्धा’ आणि ‘जेन-झी ट्रेकिंग’ या नव्या उपक्रमांनाही सुरुवात करण्यात आली आहे. छायाचित्र प्रदर्शन, माहितीपट सादरीकरण, संवाद सत्र, अनुभव कथन आदी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

मुंबईत दरवर्षी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणारे हे संमेलन राज्यातील हौशी आणि अनुभवी गिर्यारोहक, तसेच साहसी उपक्रमांची आवड असलेल्या नागरिकांना एकत्र आणणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे. गेल्या काही वर्षांपासून गिर्यारोहण आणि साहसी खेळांशी संबंधित छायाचित्रण व ब्लॉग-लेखन स्पर्धा या संमेलनाचा अविभाज्य भाग बनल्या असून त्यात दरवर्षी शेकडो स्पर्धक सहभागी होतात. यंदा ‘युद्धभूमीवरील गिर्यारोहण’ या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेच्या अनुषंगाने सियाचीन हिमनदीवरील भारतीय लष्कराचे ऑपरेशन मेघदूत आणि ऑपरेशन राजीव यावर सादरीकरण आणि चर्चा करण्यात येणार आहे.

ही सादरीकरणे वैयक्तिक साहसासाठी केले जाणारे गिर्यारोहण आणि राष्ट्रसेवेसाठी केले जाणारे गिर्यारोहण यामधील मूलभूत फरक अधोरेखित करतील. यंदाच्या संमेलनाचे अध्यक्षपद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी भूषवणार आहेत. तसेच, लेफ्टनंट जनरल रमेश कुलकर्णी, लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी आणि नायब सुभेदार बाना सिंग हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर भारतीय हवामान विभागाचे माजी प्रमुख के. एस. होसाळीकर हे प्रमुख अतिथी असतील. याबाबतची माहिती गिरिमित्रच्या संकेतस्थळावर आणि फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.