मुंबई : मुलुंड येथील एम. टी. अगरवाल रुग्णालयात पहिल्याच मान्सूनमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तब्बल ४५० कोटी रुपयांचा खर्च करून नव्याने उभारण्यात आलेल्या या बहुविशेषज्ञ रुग्णालयाच्या लिफ्ट लॉबीत रविवारी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान पाणी सचल्याच्या चित्रफिती समोर आल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १४ डिसेंबर २०२५ रोजी या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटनानंतर अवघ्या सहा महिन्यांतच रुग्णालयाच्या अंतर्गत भागात पावसाचे पाणी शिरले. मुसळधार पावसादरम्यान रुग्ण, डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी वापरत असलेल्या लिफ्ट लॉबी परिसरात पाणी साचल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. याचा रुग्णालयातील वैद्यकीय सेवा किंवा रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नसला, तरी एवढ्या मोठ्या खर्चाच्या नव्या रुग्णालयात पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरांतील आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने २०१८ मध्ये या रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाला सुरुवात केली होती. मूळ नियोजनानुसार मार्च २०२५ मध्ये प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, विविध कारणांमुळे नऊ महिन्यांचा विलंब झाला. डिसेंबर २०२५ मध्ये रुग्णालय सुरू करण्यात आले.
४५० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या प्रकल्पात अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता विभाग, आपत्कालीन सेवा, प्रगत निदान सुविधा आणि बहुविशेषज्ञ उपचार व्यवस्था साकारण्यात आली आहे. मात्र ४५० कोटी रुपये खर्चून उभ्या केलेल्या या सार्वजनिक रुग्णालयात पहिल्याच मोसमी पावसाने पाणी साचले. या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तसेच नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयाचे पूर्णत्व प्रमाणपत्र, गुणवत्ता तपासणी अहवाल, जलरोधक चाचणी नोंदी आणि डिफेक्ट लायबिलिटी करार सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे मुंबईतील सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या गुणवत्ता नियंत्रणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिकेतील एका वरिष्ठ अभियंत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, नव्याने बांधलेल्या इमारतीसाठी पहिला पाऊस ही प्रत्यक्ष चाचणी असते. अंतर्गत भागात पाणी शिरल्यास जलरोधक व्यवस्था, पाण्याचा निचरा व्हावी अशी रचना, बांधकामाची अंमलबजावणी किंवा अन्य तांत्रिक बाबींची सखोल तपासणी आवश्यक ठरते. प्रत्यक्ष कारण केवळ तांत्रिक परीक्षणातूनच स्पष्ट होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे काही काळासाठी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा अपेक्षित वेगाने काम करू शकली नाही. त्यामुळे मर्यादित भागात पाणी साचले होते. कर्मचाऱ्यांनी १५ ते २० मिनिटांत पाणी काढून परिस्थिती नियंत्रणात आणली. रुग्णसेवा सुरळीत सुरू होती. संबंधित विभागांना माहिती देण्यात आली असून, आवश्यक दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
