देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये घर घेण्याचे ८१९ जणांचे स्वप्न आज पूर्ण झाले. म्हाडाचे ८१९ घरांसाठीच्या सोडतीचे निकाल आज जाहीर झाले. मध्यम उत्पन्न गट, उच्च उत्पन्न गटातील या घरांची सोडत सकाळी १० वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहातील एका सोहळ्यात काढण्यात आली.

प्रतीक्षा नगर येथील मध्यम उत्पन्न गटातील (एससी राखीव) घरांच्या सोडतीमध्ये स्नेहा कांबळे, मृणाल कदम आणि रवींद्र कदम हे विजेते ठरले. तर यंदाच्या सोडतीमधील सर्वात महागड्या अशा लोअर परळमधील घरांची सोडत शारदा तंदूर आणि नेहा अगरवाल यांनी जिंकली. परळमधील या घरांची किंमत १ कोटी ९५ लाख रु. इतकी आहे.

यंदाच्या घराच्या लॉटरीसाठी ६५ हजार १२५ अर्ज आले होते. यावर्षी ९७२ घरांच्या सोडतीसाठी आलेल्या अर्जदारांचा आकडा एक लाख ३६ हजार इतका मोठा होता. रंगशारदा सभागृहात तसेच सभागृहाबाहेर लावण्यात आलेल्या स्क्रीनवर सोडतीचे निकाल आणि विजेत्यांची नावे दाखवण्यात आली. आजच्या मुख्य सोहळ्या आधी काल या सोडतीच्या निकालाची रंगीत तालीम घेण्यात आली. रियल इस्टेट हब असणाऱ्या मुंबईसारख्या शहरामध्ये स्वस्तातल्या म्हाडाच्या घरांसाठी हजारो जण अर्ज करतात. अनेकदा सोडतीच्या निकालानंतर होणारे आरोप-प्रत्यारोप टाळण्यासाठी यंदा सोडतीमधील पारदर्शकता ठेवण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय देखरेख समिती नेमण्यात आली होती. माजी उपलोकायुक्त सुरेश कुमार यांनी या समितीचे अध्यक्षपद भूषवले, तर नॅशनल इन्फर्मेशन सेंटरचे मोईज हुसैन अली आणि कामगार अधिकारी शिरिन लोखंडे यांनी या समितीच्या सदस्या म्हणून काम पाहिले.