मुंबई : मुंबईकरांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने महनगरपालिका प्रशासनातर्फे रविवारी सकाळी १० ते ११ या कालावधीत स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून मुंबईतील सुमारे १७८ ठिकाणांची स्वच्छता केली जाणार आहे.
हेही वाचा >>> संगीत शिक्षकाला बेकायदेशीरीत्या ताब्यात घेणे महागात पडले; दोन लाखांच्या भरपाईचे पोलिसांना आदेश




केंद्र सरकारच्या गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने १ ऑक्टोबर रोजी एक तास श्रमदानातून ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचे राष्ट्रीय पातळीवर आयोजन केले आहे. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस संयुक्तरित्या हा उपक्रम राबविणार आहेत. या उपक्रमामध्ये शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, समुद्रकिनारे, बस – रेल्वे स्थानके, शासकीय कार्यालये आदी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासोबतच कचरा वर्गीकरण, कचऱ्याचा पुनर्वापर, एकल वापराच्या प्लास्टिक वापरास पर्याय शोधणे, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता आदी महत्त्वपूर्ण विषयांवर संदेश देण्यात येणार आहे. तसेच, सहभागी नागरिकांना स्वच्छताविषयक प्रतिज्ञा, प्लास्टिक बंदी आणि शून्य कचरा याबाबत शपथ दिली जाणार आहे.
हेही वाचा >>> मुंबई : गिरगावमधील बहुमजली इमारतीला आग; इमारतीत अडकलेल्या २७ रहिवाशांची सुखरूप सुटका
नागरी संघटना, स्वयंसेवी संस्था, सिनेसृष्टीतील कलावंत, स्वयंसेवक, केंद्र आणि राज्य सरकारचे विविध विभाग, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) तसेच इतर महाविद्यालयीन विद्यार्थी या स्वच्छता अभियानात सहभागी होणार आहेत. गेट वे ऑफ इंडिया, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान (राणी बाग), माहीम चौपाटी, दादर समुद्रकिनारा, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), जुहू समुद्रकिनारा, गोराई समुद्रकिनारासह मुंबईतील इतर १७८ ठिकाणची स्वच्छता केली जाणार आहे. या स्वच्छता अभियानात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू , अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.