मुंबई : भूषण गगराणी यांच्या निवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या मुंबई महापालिका आयुक्तपदाच्या नियुक्तीवरून महायुती सरकारमध्ये मतभेद झाल्याचे समजते. आयुक्तपदासाठी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र त्यांच्या नावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आक्षेप असल्याचे समजते. शिंदे यांनी त्यांचे सचिव असिम गुप्ता यांच्या नावाचा आग्रह धरला असल्याने आयुक्तपदाच्या नियुक्तीचा तिढा निर्माण झाला आहे.

महापालिका आयुक्त भूषण गगराणी ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना तांत्रिक मुद्द्यावर मुदतवाढ मिळेल, अशी चर्चा सुरू होती. पण अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला केंद्र सरकारकडून मुदतवाढ दिली जात नाही. आयुक्तपदासाठी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांचे नाव आघाडीवर आहे. भिडे या मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील असून, पालिकेत भाजपची सत्ता आल्याने विकासकामे मार्गी लावण्यासाठी भिडे या उपयुक्त ठरू शकतात, असा एक मतप्रवाह आहे. भुयारी मेट्रो, सागरी मार्ग हे दोन महत्त्वाकांक्षा प्रकल्प मार्गी लावण्यात भिडे यांची भूमिका महत्त्वाची होती.

भिडे यांच्या नावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आक्षेप असल्याचे समजते. शिंदे यांनी त्यांचे सचिव असिम गुप्ता यांच्या नावाचा आग्रह धरल्याचे समजते. गुप्ता यांच्याकडे उपमुख्यमंत्री कार्यालयाबरोबरच नगरविकास विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार आहे. भिडे किंवा गुप्ता यांच्या नावांवर सहमती होऊ न शकल्यास विकास खारगे यांच्या नावाचा पर्याय येऊ शकतो. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. सजंय मुखर्जी यांच्या नावाची आधी चर्चा होती. मुंबई महानगरपालिका आयुक्त या महत्त्वाच्या पदावर आपल्या जवळच्या अधिकाऱ्याचीच नियुक्ती करण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा भर असेल.