मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची गेल्या वर्षी नियुक्ती करताना ज्येष्ठता हा निकष डावलण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आयुक्तपदावरील नियुक्तीत ज्येष्ठतेचा विचार होणार की मर्जीतील अधिकाऱ्याची नियुक्ती होणार याची सध्या प्रशासनात कुजबुज सुरू झाली आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी हे मंगळवारी निवृत्त होत आहेत. नव्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होणार याची प्रशासनात उत्सुकता आहे. मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. भिडे यांच्या नावाला उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे अनुकूल नसल्याचे समजते. गेल्याच वर्षी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती करताना अनेक अधिकाऱ्यांची ज्येष्ठता डावलण्यात आली होती. देवेन भारती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकारी ओळखले जातात. त्यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती करण्यात आली होती. भारती यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यावर विशेष पोलीस आयुक्तपद हे पद भरण्यात आलेले नाही.
अश्विनी भिडे या १९९५ च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असून, त्यांची नियुक्ती झाल्यास १९९० ते १९९४ या तुकडीतील १० ते १२ अधिकाऱ्यांची ज्येष्ठता डावलली जाईल. मिलिंद म्हैसकर, असिम गुप्ता, विकास खारगे, मनीषा वर्मा, व्ही. राधा आदी अधिकारी हे भिडे यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. यामुळे ज्येष्ठता की मर्जीतील अधिकारी हा प्रश्न सध्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे चर्चिला जात आहे.मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी आता अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. पण यापूर्वी प्रधान सचिव पदावरील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असे. अलीकडच्या काळात जयराज फाटक, स्वाधीन क्षत्रिय, सीताराम कुंटे आदी अधिकारी प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी होते. पूर्वी राज्यात अतिरिक्त मुख्य सचिवपदाची सहाच पदे मंजूर होती. नवीन रचनेत १० पेक्षा अधिक अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी असल्याने महत्त्वाच्या पदांवर नियुक्तीत अतिरिक्त मुख्य सचिवांना संधी दिली जाते.
राज्यात गृह सचिव हे अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे असेल, असे राज्य शासनाच्या वतीने उच्च न्यायालयात अनेक वर्षांपूर्वी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. कारण पोलीस महासंचालकांना गृह सचिवाशी समन्वय साधावा लागतो. त्यातूनच गृह सचिवपदाचा वाद न्यायालयात गेला होता. मुंबई महानगरपालिकेत द. शं. सोमण आणि राममूर्ती या दोन भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांनी अतिरिक्त मुख्य आयुक्त म्हणून काम केले होते. मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी कोणाची व कोणत्या दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची याचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात.
