मुंबई : मुंबई महापालिकेच्या १६५ सहाय्यक अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर बढती देण्याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी मुंबई महापालिकेच्या सभागृहात मंजूर करण्यात आला. सर्व पक्षीय नगरसेवकांनी या प्रस्तावाला पाठिंबा देऊन तो मंजूर केला. मात्र बढतीनंतर बदल्यांच्या प्रक्रियेला वेग येणार असून बदल्यांमागे आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभियंत्यांच्या बदलीचा अहवाल सादर करण्याची मागणी केली.
नुकत्याच झालेल्या स्थापत्य समिती (शहर) आणि महानगरपालिका सभागृहाच्च्याया बैठकीत तातडीचे कामकाज म्हणून १६५ सहाय्यक अभियंत्यांची ‘कार्यकारी अभियंता’ म्हणून पदोन्नतीचा विषय मंजूर करण्यात आला. विरोधकांनी तातडीचे कामकाज म्हणून आलेल्या प्रस्तावांना गुरुवारी विरोध केल्यामुळे सत्ताधारी पक्षावर नामुष्की ओढवली होती. मात्र अभियंत्यांच्या बढतीचा प्रस्ताव तातडीचे कामकाज म्हणून सर्व पक्षीय नगरसेवकांनी मंजूर केला. बढतीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे अभियंत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बदल्यांसाठी राजकीय दबाव
दरम्यान, या पदोन्नतीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक मागणी केली आहे. पदोन्नती मिळालेल्या सर्व कार्यकारी अभियंत्यांना नवीन जबाबदारी देताना त्यात पारदर्शकता असणे आवश्यक आहे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालिकेतील गटनेते यशवंत किल्लेदार यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अभियंत्यांच्या बदल्या करताना आर्थिक व्यवहार केले जातात. काही अभियंते वर्षानुवर्षे एका विभागात कार्यरत असतात, तर काही अभियंते चांगल्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी प्रयत्नशील असतात. राजकीय दबाव आणि आर्थिक व्यवहार या माध्यमातून अनेकजण प्रयत्नशील असतात, असे या पत्रात म्हटले आहे.
पदोन्नती पारदर्शक हवी
यास्तव पदोन्नती देताना पारदर्शकता ठेवावी. तसेच कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. बढती मिळालेल्या अभियंत्यांना जबाबदारी दिल्यानंतर त्याचा अहवाल सादर करावा, अशी मागणीही किल्लेदार यांनी केली.
अभियंत्यांच्या बदल्यांसाठी तत्काळ समिती
मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांमागील कथित आर्थिक व्यवहाराला आळा घालण्यासाठी अभियंत्यांच्या बदली आणि पदोन्नती प्रक्रियेसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी अभियंत्यांच्या संघटनेने केली आहे. बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स युनियनने महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना याप्रकरणी गेल्याच आठवड्यात पत्र पाठवून तत्काळ समिती स्थापन करण्याची मागणी केली.
बदल्यांसाठी एआयची मदत
मुंबई महानगरपालिकेत विविध खात्यांमध्ये मिळून सुमारे ४ हजार ५०० अभियंते कार्यरत आहेत. नियमानुसार अभियंत्यांची दर तीन वर्षांनी बदली होणे आवश्यक आहे. त्यामुळे अभियंत्यांच्या बदलीसाठी पारदर्शक पद्धतीची मागणी संघटनेने केली आहे. याकरीता सॉफ्टवेअर व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने ही प्रक्रिया सुलभपणे राबवता येऊ शकते, अशीही सूचना पत्रात करण्यात आली आहे.
