मुंबई : मुंबईतील वृक्षांचे संरक्षण व पर्यावरणीय समतोल अबाधित राखण्यासाठी महानगरपालिकेने वृक्ष संवर्धन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. वृक्षांना इजा पोहोचविणे तसेच मंजूर परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात वृक्षांची छाटणी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गृहनिर्माण संस्थांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दिंडोशी मेट्रो स्थानकाजवळील शितल तपोवन हाऊसिंग सोसायटी लिमिटेड संकुलाबाहेरील वृक्षांना इजा पोहोचवल्याप्रकरणी संबंधित गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी व विकासकाविरुद्ध कुरार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच, घाटकोपर (पश्चिम) येथील कल्पतरू ऑरा हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या आवारातील वृक्षांची महानगरपालिकेने मंजूर केलेल्या परवानगीच्या मर्यादेपेक्षा अधिक छाटणी केल्याचे आढळून आल्याने संबंधित गृहनिर्माण संस्थेविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृक्षसंवर्धन नियमांचे उल्लंघन करून वृक्षांना इजा पोहोचविणाऱ्या किंवा परवानगीच्या अटींचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा विकासकाला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. वृक्षांचे संरक्षण, संवर्धन व पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे सर्व संबंधितांसाठी बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा विकासकाविरुद्ध यापुढेही नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
दिंडोशी मेट्रो स्थानकाजवळ डीजीएम शितल तपोवन हाऊसिंग सोसायटी आहे. या सोसायटीसमोरील दोन झाडांना विषारी इंजेक्शन देऊन ती सुकविण्यात आल्याची ऑनलाइन तक्रार ‘पी’ उत्तर विभागाकडे प्राप्त झाली. त्यानंतर उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदार समवेत संबंधित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यालगत असलेल्या पेल्टोफोरम प्रजातीच्या झाडाच्या बुंध्यावर जमिनीलगत सुमारे २० ते २२ छिद्रे पाडून त्यामध्ये विषारी इंजेक्शन देण्यात आल्याचे आढळून आले.
सोसायटीच्या दुसऱ्या प्रवेशद्वारासमोरील झाड पूर्णपणे सुकलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. सोसायटीने झाडांना हानी पोहोचविल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट झाल्याने, संबंधितांविरुद्ध महानगरपालिकेतर्फे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्षांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ सह कलम २१ अन्वये कुरार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
घाटकोपर येथील कल्पतरू ऑरा हाऊसिंग सोसायटी लिमिटेड गृहसंकुलात १०० हून अधिक झाडांची पालिकेने मंजूर केलेल्या परवानगीच्या मर्यादेपेक्षा अधिक छाटणी केल्याची तक्रार एन विभागाकडे प्राप्त झाली. तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. वृक्षांच्या छाटणीसाठी पालिकेकडून विशिष्ट अटी व मर्यादांसह परवानगी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत मंजूर परवानगीच्या कक्षेबाहेर जाऊन अधिक प्रमाणात छाटणी करण्यात आल्याचे आढळून आले.
नागरिकांना आवाहन
कोणत्याही झाडाला इजा पोहोचविणे, विषारी द्रव्ये किंवा इंजेक्शन देणे, झाडे तोडणे किंवा नष्ट करणे हे कायद्याने दंडनीय अपराध आहेत. अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ संबंधित विभागाला माहिती देऊन पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
