मुंबई : भविष्यात मुंबईला पाच प्रमुख वातावरणीय धोके आहेत. शहरी उष्णता, शहरात येणारे पूर, दरड कोसळणे, सागरतटीय धोके, वायू प्रदूषण हे महत्त्वाचे धोके आहेत. दाट वस्ती, कमी होत असलेली हिरवळ, सूर्यकिरणे प्रतिबिंबित करणाऱ्या बांधकाम साहित्याचा वापर यामुळे उष्णतेचा धोका वाढत आहे. अतिवृष्टीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये मुंबईच्या संदर्भातील पाच प्रमुख वातावरण जोखीमांचा समावेश करण्यात आला आहे.

वाढते प्रदूषण, वातावरणातील बदल यामुळे विविध प्रकारच्या आपत्तींचा सामना करावा लागत आहे. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात अशा प्रकारच्या आपत्तींचा सामना करून भविष्य सुरक्षित करण्यासाठी महानगरपालिकेने पाऊल उचलले आहे. त्याकरीता पालिकेने तयार केलेल्या वातावरणीय अर्थसंकल्प अहवालात मुंबईला असलेल्या नैसर्गिक आपत्तींचाही आढावा घेण्यात आला आहे.

हेही वाचा >>> आरटीई कायद्यातील दुरुस्तीनंतर दिलेल्या प्रवेशांना संरक्षण द्या; खासगी शाळांच्या संघटनेची उच्च न्यायालयात धाव

मुंबईत १९७३ पासून प्रत्येक दशकात ०.२५ अंश सेल्सिअसच्या तापमानवाढीचा कल दिसून आला आहे. तर ९० च्या दशकाच्या मध्यापासून दरवर्षी २०० पेक्षा अधिक दिवस अति काळजी घेणे आवश्यक असलेल्या घटना घडल्या आहेत, असे या अहवालात म्हटले आहे.

मुंबईत अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईतील ३५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या पूरप्रवण म्हणून नोंदवलेल्या ठिकाणांच्या २५० मीटर अंतराच्या आत वास्तव्यास आहे. तर अस्थिर उतारावरील वस्त्यांना पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका असतो. मुंबई २८७ ठिकाणे ही भूस्खलनप्रवण आहेत त्यापैकी २०९ ठिकाणे धोकादायक परिस्थितीत आहेत. मुंबईतील धूलिकणांचे प्रमाणही सातत्याने वाढत असून विविध उपाययोजनांद्वारे हे प्रमाण कमी करण्याची गरज असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे. २०१५ ते २०२० या काळात ओझोनच्या वार्षिक केंद्रीकरणात संथ घट होण्याचा कल दिसून आला आहे. वातावरणीय अर्थसंकल्प अहवालात विविध विभागातील कृतींचा आढावा घेण्यात आला आहे. त्यात काही तातडीचे उपाय, तर काही दूरगामी उपाय सुचवण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> Central Railway Services Disrupted : मध्य रेल्वेवर सलग तीन दिवस खोळंबा

यामधील उपायांनुसार घनकचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे, कचऱ्यापासून वीज निर्मितीचे प्रकल्प, हायमास्ट दिव्यांमध्ये सुधारणा, सौर उर्जेचा वापर, एलईडी दिवे बसवणे, ई वाहनांचा वापर अशा उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.

१८ चक्रीवादळाच्या घटना मुंबई आणि अरबी समुद्राला लागून असलेल्या भागात २०११ ते २०२१ दरम्यान १८ चक्रीवादळाच्या घटना घडल्याचे पालिकेच्या वातावरणीय अर्थसंकल्प अहवालात म्हटले आहे. अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या वार्षिक तापमानात संथ, परंतु स्थिर वाढ झाल्यामुळे या घटना घडल्या आहेत. तीव्र भरतीचे परिणाम शोषून घेणाऱ्या टेट्रा पॉडसमुळे मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर धूप झालेली दिसली नाही.