मुंबई : मुंबई महापालिकेच्या शिक्षण, स्थायी, सुधार आणि बेस्ट या चार वैधानिक समित्यांवर विविध  पक्षांनी ज्येष्ठ नगरसेवकांना संधी दिली आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाने पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश केलेल्यांना समिती सदस्यत्व बहाल केले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना सुधार समितीवर तर राष्ट्रवादीतून आलेल्या राखी जाधव यांना भाजपने स्थायी समितीवर संधी दिली आहे. महापौरपदाने हुलकावणी दिलेल्या राजेश्री शिरवडकर यांना शिक्षण समितीवर पाठवण्यात आले आहे. तर शिक्षण आणि बेस्ट समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून ज्येष्ठ नेत्यांच्या निकटवर्तीयांना स्थान मिळाले आहे.

मुंबई महापालिकेच्या चार वैधानिक समित्यांवर सदस्यांच्या नेमणुकीसाठी सोमवारी विशेष सभा बोलवण्यात आली होती. या सभेत राजकीय पक्षांनी सदस्यत्वासाठी दिलेल्या नावांची घोषणा महापौर रितू तावडे यांनी सभागृहात केली.

नेत्यांच्या नातेवाईकांची वर्णी

 विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू असलेले मकरंद नार्वेकर, आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांना स्थायी समितीवर पाठवण्यात आले आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले चंदन शर्मा यांना सुधार समितीवर पाठवले आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आमदार सुनील प्रभू यांचे पुत्र अंकित प्रभू यांना शिक्षण समितीवर संधी मिळाली.

बेस्टवर सर्वाधिक नामनिर्देशित

बेस्ट समितीवर सर्वाधिक नामनिर्देशित सदस्य असून शिवसेना (ठाकरे) पक्षाने बेस्ट समितीवर आमदार सचिन अहिर यांचे बंधू सुनील अहिर यांना संधी दिली आहे. मनसेतून ठाकरे यांच्या शिवसेनेत आलेले नितीन नांदगावकर यांनाही बेस्टवर संधी दिली आहे. शिक्षण समितीवर नामनिर्देशित नगरसेवक म्हणून शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांचे पुतणे प्रियांक संदीप राऊत यांना संधी दिली आहे.

 राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना स्थान

शिवसेना (शिंदे) पक्षाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना आपल्या बरोबर घेतले आहे. या दोन गटाचे मिळून चार नगरसेवक आहेत. या नगरसेवकांनाही विविध समित्यांवर पाठवण्यात आले आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या डॉ. सईदा खान यांना स्थायी समितीवर तर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे अजित रावराणे यांना सुधार समितीवर संधी मिळाली.