मुंबई : मुंबईत बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने कडक पावले उचलली आहेत. दक्षता विभागामार्फत संपूर्ण शहरातील जन्म-मृत्यू नोंदींशी संबंधित सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच, जन्म-मृत्यू नोंदणी प्रणालीत बदल करण्याचा निर्णय घेतला असून सर्व २४ विभागांतील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची टप्प्याटप्प्याने बदली करण्यात येणार आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणावर बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचे आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले होते. या प्रकरणी देवनार पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यामध्ये देवनार, मानखुर्द, गोवंडी या भागात सर्वाधिक खोट्या दस्तावेजाच्या आधारे जन्म प्रमाणपत्र दिल्याचे आरोप झाले होते. या प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने चौकशी करून २३७ बनावटरीत्या मिळवलेली जन्म प्रमाणपत्रे रद्द केली आहेत, चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे आणि आठ प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.
चौकशीत असे आढळून आले की मुंबईतील अनेक प्रकरणांमध्ये जन्म नोंदणी आणि मृत्यू नोंदणी प्रणालीत अनियमितता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने ३० एप्रिलला या प्रकरणी मोठा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागांतर्गत सर्व २४ प्रभागांत प्रशासकीय सुधारणा करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला पालिका आयुक्तांनी मंजूरी दिली असून तत्काळ अंमल बजावणीचे आदेश दिले असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
आता पर्यंत ही कारवाई केली …
या प्रकरणी आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेने २३७ बनावट जन्म प्रमाणपत्रे रद्द केली.
या २३७ बनावट प्रमाणपत्रांपैकी १६८ प्रकरणे देवनार, मानखुर्दचा समावेश असलेल्या एम/पूर्व वॉर्डातील होती. सर्व २३७ प्रमाणपत्रे सीआरएसएस पोर्टलवरून रद्द करण्यात आली असून बनावट प्रमाणपत्रांची यादी पासपोर्ट कार्यालयाकडेही पाठवण्यात आली आहे.
२३७ बनावट प्रमाणपत्रांपैकी १३९ खोटी प्रमाणपत्रे परत मिळवली.
६८ सापडली नाहीत व २८ जणांनी परत देण्यास नकार दिला.
सर्व प्रकरणे अतिरिक्त पोलीस आयुक्त (विशेष शाखा) व स्थानिक पोलीस ठाण्याकडे पाठवली असून या प्रकरणी तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एम पूर्व विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी (एमओएच) व २ जन्म नोंदणी लिपिक निलंबित झाले असून २ वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
८० हजार नोंदी ….
या प्रकरणी केलेल्या चौकशीत असे आढळले की अनेक वॉर्डातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनधिकृतपणे सीआरएसएस पोर्टलवरून जुन्या नोंदीद्वारे प्राप्त माहितीवर आधारित जन्म-मृत्यू नोंदी करत होते. २०१४ ते २०२५ या कालावधीत सुमारे ८०,००० नोंदी करण्यात आल्याचे आढळून आले आहे.
तर सीआरएसएस पोर्टलवर केवळ ३३,७५२ नोंदी सापडल्या. त्यामुळे प्रशासनाने एसएमपी प्रणालीतील पद्धतीत सर्व नोंदी तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. माहिती तंत्रज्ञान संचालकांनी प्रशासनासोबत वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची सर्व प्रणाली ऑडिट करण्यास सांगितले आहे.
सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार …
या प्रकरणानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने सर्व २४ विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी टप्प्याटप्प्याने बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
जनगणनेचे काम प्राधान्याने असल्यानुसार सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची बदली करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात अंधेरी पश्चिम, दहिसर आणि भायखळा यांचा समावेश असलेल्या
के पश्चिम, आर उत्तर आणि ई विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात येणार आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व बीडीओ यांच्यामधील जबाबदाऱ्यांचे पुनर्वाटप करून आरोग्य विभागाची पुनर्रचना करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
