मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीला दिलेल्या ८०० कोटींच्या विकासनिधीचे वाटप करताना सत्ताधारी भाजपने विरोधकांना कमी निधी दिला आहे. एकेकाळचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांना केवळ २५ लाखांचा निधी देण्यात आला आहे. मात्र एमआयएम पक्षाच्या प्रथमच निवडून आलेल्या आठ नगरसेवकांना किमान दोन दोन कोटींचा विकासनिधी देण्यात आला आहे. भाजपच्या या एमआयएम प्रेमामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुंबई महापालिकेचा २०२६-२७ चा तब्बल ८०,९५२ कोटींच्या अर्थसंकल्पाला सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली, तेव्हा स्थायी समितीला ८०० कोटींचा विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मुंबई महापालिकेवर ज्या पक्षाची सत्ता असते तो पक्ष विकासनिधीच्या वाटपात राजकारण करतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे. एकसंघ शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेवर होती तेव्हा भाजपच्या नगरसेवकांना विकासनिधी कमी दिल्याचा आरोप तेव्हा भाजपने केला होता. त्याचाच वचपा काढत भाजपने यावेळी शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांना अवघा २५ लाखांचा निधी दिला आहे.

निधी वाटपात भाजपने शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसच्या नगरसेवकांना कमीतकमी निधी दिला आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे एमआयएमच्या आठ नव्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील कामांसाठी किमान दोन कोटींचा निधी प्रत्येकी दिला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

ज्यांची पत्र आली त्यांना निधी दिला

ज्या नगरसेवकांची विकासकामांसाठी पत्रे आली होती त्यांना निधी दिला आहे. एमआमएमच्या नगरसेवकांनी पत्र दिली होती. त्यामुळे त्यांना निधी दिला आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांना विकासनिधी २५ लाख दिला असला तरी नियमानुसार एक कोटींचा नगरसेवक निधी मिळणारच आहे. – प्रभाकर शिंदे, स्थायी समिती अध्यक्ष

भाजपशी या एमआयएमचे काय हितसंबंध

विकासनिधीच्या वाटपात भाजपने एमआयएम, समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांना भरघोस निधी दिला, मग या पक्षांशी भाजपचे काय हितसंबंध आहेत, असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. भाजपने केवळ काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांना कमी निधी दिला, मात्र समाजवादी पक्ष, एमआयएम व राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) या विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनाही भरीव निधी दिला आहे. मग या पक्षांशी भाजपाचे काय हितसंबंध आहेत ? त्यांच्यावर एवढे प्रेम का आहे ? व काँग्रेस पक्षावर काय राग आहे, असा प्रश्न वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.

एमआयएमच्या या नगरसेवकांना निधी

प्रभाग क्रमांक – नगरसेवकाचे नाव

१३४ मेहजाबीन अतिक अहमद खान

१३६ जमीर कुरेशी

१३७ श्मीर पटेल

१३८ रोशन इरफान शेख

१३९ शबाना आतिफ शेख

१४० विजय उबाळे

१४३ शबाना मोहम्मद फारूक काझी

१४५ खैरनुसा अकबर हुसेन