मुंबई : मुंबई महापालिकेच्या सन २०२६-२७ चा तब्बल ८०,९५२ कोटींच्या अर्थसंकल्पाची खर्चाची बाजूही शुक्रवारी पालिका महासभेत मंजूर करण्यात आली. त्यामुळे या अर्थसंकल्पातील तरतूदी आता वापरता येणार आहेत. अर्थसंकल्पात फेरफार करून प्रथेनुसार महापौरांनाही विकासनिधी म्हणून अडीचशे कोटींचा निधी देण्यात आला आहे. महापौरांच्या शिफारशीनुसार तो नगरसेवकांना वितरित केला जाणार आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वाधिक महापौर विकासनिधी आहे. दरम्यान, स्थायी समितीमधील विकासनिधीच्या वाटपावरून वाद झाल्यानंतर या निधीत ५४ कोटींची कपात करण्यात आली असून हा निधी पालिकेच्या विविध योजनांमध्ये वळवण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाची उत्पन्नाची बाजू गेल्या आठवड्यात मंजूर झाली. त्यानंतर शुक्रवारी उत्पन्नाची बाजूही मंजूर करण्यात आली असून आता या अर्थसंकल्पातील तरतूदी विकासकामांसाठी वापरता येणार आहेत. सभागृहात अर्थसंकल्पाला मंजूरी देताना प्रथेप्रमाणे महापौरांना विकासनिधी देण्यात आला आहे. यंदा महापौरांना अडीचशे कोटींचा निधी देण्यात आला असून हा निधी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक निधी आहे. यापूर्वी १०० ते दीडशे, पावणे दोनशे कोटींचा निधी महापौरांच्या अधिकारात दिला जात असे. यावर्षी यात वाढ झाली आहे. घनकचरा विभाग, रस्ते काँक्रीटीकरण, पूल विभाग या विभागांच्या तरतूदीत कपात करून तो निधी महापौर विकास निधीसाठी देण्यात आला आहे.

स्थायी समितीच्या तरतूदीत कपात

स्थायी समितीमध्ये अर्थसंकल्पाला जेव्हा मंजूरी देण्यात आली तेव्हा ८०० कोटींचा विकासनिधी देण्यात आला होता. या विकासनिधीच्या वाटपावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यात सर्व नगरसेवकांना सव्वा दोन कोटींचा निधी देण्यात आला होता. मात्र काही नगरसेवकांना पाच, दहा, वीस कोटींचा निधी देण्यात आला होता. तर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्या प्रभागासाठी ३० कोटी, गणेश खणकर यांच्या प्रभागासाठी ३० कोटींचा निधी देण्यात आला होता.

तर आमदार अमित साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांना प्रत्येकी सहा कोटींचा निधी देण्यात आला होता. या वरून वाद झाल्यानंतर या सगळ्या निधीत कपात करण्यात आली आहे. खणकर व शिंदे यांच्या निधीत प्रत्येकी पंधरा कोटींची कपात करण्यात आली आहे. हा कपात केलेला निधी सफाई कामगारांच्या आश्रय योजनेसाठी देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिली.

अमित साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांच्या निधीतही कपात … आमदार अमित साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांना जादा निधी दिल्याच्या चर्चेनंतर अतिरिक्त निधी कमी करावा असे पत्र साटम यांनी स्थायी समिती अध्यक्षांना दिले होते. त्यानुसार या नगरसेवकांचा निधी पावणे चार कोटींनी कमी करून त्यांना इतर नगरसेवकांप्रमाणे सव्वा दोन कोटींचा निधी देण्यात आला आहे.

महापौर विकास निधीचे वाटप असे…

सर्वाधिक महापौर विकास निधी मिळालेल्या नगरसेवकांमध्ये भाजपच्या अर्चना भालेराव यांना १० कोटी रुपये, शिवसेना (शिंदे) पक्षाचे किरण लांडगे यांना ५ कोटी रुपये, भाजपचे तेजिंदर सिंग तिवाना यांना ५ कोटी रुपये, तर शिवसेना (शिंदे) पक्षाचे विजेंद्र शिंदे यांना ४.५ कोटी रुपये निधी देण्यात आला.

तर सर्व गटनेत्यांना एक कोटींचा निधी दिला आहे. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांना १ कोटी रुपये, तसेच शिवसेना (ठाकरे) गटाच्या दीपमाला बढे आणि यशोधर फणसे यांनाही प्रत्येकी १ कोटी रुपये देण्यात आले. गटनेत्यांमध्ये काँग्रेसचे अशरफ आजमी , मनसेचे यशवंत किल्लेदार आणि एआयएमआयएमचे विजय उबाळे यांनाही प्रत्येकी १ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.