मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७ चा तब्बल ८०,९५२ कोटींच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने सोमवारी मंजूरी दिली. स्थायी समितीला ८०० कोटींचा विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदे) महायुती आता या विकासनिधीचे वाटप कसे करणार, कोणत्या पक्षाला किती निधी मिळणार, शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांना किती निधी मिळणार याबाबत आता उत्सुकता आहे. यंदा अर्थसंकल्प उशीरा सादर झाल्यामुळे अद्याप अर्थसंकल्पाला महासभेची मंजुरी मिळणे बाकी आहे.
श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंजूर होण्यास यंदा प्रथमच उशीर झाला आहे. दरवर्षी ४ फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प यंदा निवडणुकांमुळे २० दिवस उशीरा स्थायी समितीकडे सादर झाला होता. अर्थसंकल्पावर गेल्या काही दिवसापासून स्थायी समितीमध्ये चर्चा सुरू होती.
अर्थसंकल्पावरील भाषणानंतर ६ एप्रिलला स्थायी समितीने या अर्थसंकल्पाला मंजूरी दिली. स्थायी समितीला अर्थसंकल्पातून किती कोटींचा विकास निधी मिळाला याबाबत उत्सुकता असते. यावेळी स्थायी समितीला ८०० कोटी रुपयाचा विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे या निधीचे वाटप कोणत्या पक्षाला किती प्रमाणात करायचे याचा अधिकार प्रथा परंपरेनुसार सत्ताधारी भाजप पक्षाकडे आहे. त्यामुळे यावेळी कॉंग्रेस, समाजवादी या विरोधी पक्षांबरोबच शिवसेना (ठाकरे) पक्षाला किती निधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार स्थायी समितीला दरवर्षी अर्थसंकल्प मंजूर करण्यापूर्वी प्रशासनामार्फत विकास निधी उपलब्ध करून दिला जातो. आतापर्यंत ५०० ते ६०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र त्यावेळी सत्ताधारी भाजपने जास्तीत जास्त ८०० कोटींचा निधी स्थायी समितीसाठी मिळवला आहे. त्यामुळे या निधीचे वाटप कसे करायचे हे सर्वस्वी महायुतीच्या हातात आहे.
सभागृहाच्या मंजूरीची प्रतीक्षा …
हा अर्थसंकल्प आता अंतिम मंजुरीसाठी ९ एप्रिलला महापालिका सभागृहात सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर १५ एप्रिलपासून सभागृहात अर्थसंकल्पावरील भाषणे होतील व ३० एप्रिलला सभागृहाची मंजूरी मिळेल. नंतरच १ मे पासून अर्थसंकल्प लागू होईल.
सगळ्यांना निधी दिला जाईल …स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे
याबाबत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की सगळया नगरसेवकांना निधी दिला जाणार आहे. मुंबईतील प्रत्येक नगरसेवकाला एक कोटी रुपयांचा विकास निधी दिला जाईल. त्यामुळे मुंबईतील २३७ नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी रुपये विकास निधी यावेळीही मिळणार आहे. उर्वरित निधीचे विकास कामांसाठी वाटप केले जाईल. ज्या नगरसेवकांनी विकास निधीसाठी पत्र दिले आहे. त्यांच्या प्रकल्पाचा विचार करून त्यांना निधी उपलब्ध करून दिला जाईल.
विरोधकांना कमी निधी मिळण्याची शक्यता
मुंबई महानगरपालिकेमध्ये २०१७ ते २०२२ दरम्यान शिवसेना ठाकरे गटाची एकहाती सत्ता होती. या काळात ठाकरे गटाने भाजपाला कमी निधी दिला होता. याचा वचपा यावेळी भाजपा काढण्याची शक्यता आहे. तसेच प्रशासकाच्या काळात शिवसेना (ठाकरे) पक्षाला निधी मिळाला नव्हता. सर्व विकासनिधी हा सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातच खर्च करण्यात आला. त्यामुळे यंदा शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेस यांना भाजप किती निधी देणार याबाबत उत्सुकता आहे.
