मुंबई : मुंबई महापालिकेच्या २०२६-२७ च्या तब्बल ८०,९५२ कोटींच्या अर्थसंकल्पाला अखेर सभागृहात मंजुरी देण्यात आली. तब्बल ९४ तास चाललेल्या विक्रमी वेळेच्या चर्चेत १८८ नगरसेवकांनी सहभाग घेतला होता. गेल्या बारा दिवसांपासून सुरु असलेल्या या अर्थसंकल्पावरील चर्चेचा गुरुवारी मध्यरात्री समारोप झाला व पालिका आयुक्त आश्विनी भिडे आणि महापौर रितू तावडे यांच्या भाषणानंतर मध्यरात्री एक वाजता अर्थसंकल्प मंजूर झाला. निधीच्या असमान वाटपाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला.
श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंजूर होण्यास यंदा प्रथमच तब्बल एक महिना उशीर झाला. दरवर्षी ४ फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प यंदा निवडणुकांमुळे २० दिवस उशीराने स्थायी समितीला सादर झाला होता.
अर्थसंकल्पावरील भाषणांनंतर ६ एप्रिलला स्थायी समितीने या अर्थसंकल्पाला मंजूरी दिली. त्यानंतर हा अर्थसंकल्प महासभेच्या पटलावर मांडण्यात आला होता. १५ एप्रिलपासून अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती. ३० एप्रिलला मध्यरात्री अखेर अर्थसंकल्पाची उत्पन्नाची बाजू मंजूर करण्यात आली. दरवर्षी अर्थसंकल्प १ एप्रिलपासून लागू होत असतो. यंदा एक महिना उशीर झाला आहे. अर्थसंकल्प मंजूर होईपर्यंत सभागृहात सभागृह नेता गणेश खणकर, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेता अमेय घोले, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
थेट प्रक्षेपण प्रथमच
मुंबई महापालिकेच्या सभागृहाचे कामकाज आता युट्यूबवरून थेट प्रक्षेपणाद्वारे पाहता येत असल्यामुळे यंदा प्रथमच अर्थसंकल्पावरील चर्चेचेही थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे प्रसारमाध्यमांना, मुंबईकरांना हे कामकाज थेट पाहता आले. तसेच नगरसेवकांची भाषणे ऐकणे मतदारांना शक्य झाले. अर्थसंकल्पावरील चर्चेच्या निमित्ताने सभागृहाचे कामकाज सकाळी ११ वाजल्यापासून रात्री उशीरापर्यंत सुरु होते. तितका वेळ नगरसेवक, पालिकेचे कर्मचारी अधिकारी सभागृहात थांबत असत.
महापौरांनी मानले आभार
चर्चेच्या शेवटी महापौरांनी सर्वांचे आभार मानले. मुंबईच्या सर्व भागांमधून दररोज हजेरी लावून, रात्री उशिरापर्यंत तितक्याच उत्साहाने आणि अभ्यासपूर्ण रितीने मत, सूचना मांडणाऱ्या सर्व सदस्यांचे महापौरांनी आभार मानले.
महानगरपालिकेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने सदस्यांना सविस्तरपणे आपले मत संधी मांडण्याची मिळाली. लोकशाही मूल्यांना बळकटी देणारी बाब आहे.
प्रथमच थेट प्रक्षेपण झाल्यामुळे पारदर्शकतेचा आणि उत्तरदायित्वाचा शब्द आम्ही खरा करून दाखवला असेही महापौर यावेळी म्हणाल्या.
