मुंबई : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर होण्यास यंदा निवडणुकीमुळे तब्बल एक महिना उशीर झालेला असताना या अर्थसंकल्पावरील चर्चाही लांबत चालली आहे. बोलण्यासाठी नावे देणाऱ्या नगरसेवकांची संख्याही वाढू लागली आहे आणि जास्तीजास्त किती तास बोललो याचीही स्पर्धा लागली आहे. त्यामुळे चर्चा संपवून अर्थसंकल्प मंजूर करणे हे सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान आहे.

श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंजूर होण्यास यंदा प्रथमच उशीर झाला आहे. दरवर्षी ४ फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प यंदा निवडणुकीमुळे २० दिवस उशीराने स्थायी समितीला सादर झाला होता.

६ एप्रिलला स्थायी समितीने या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर हा अर्थसंकल्प पालिका सभागृहात मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला असून अर्थसंकल्पावर १५ एप्रिलपासून सभागृहात चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून लांबली आहे. आधी ५१ नगरसेवकांनी भाषणासाठी नावे दिली होती. मात्र ही नावे वाढत चालली असून तब्बल १०१ नगरसेवकांनी भाषणासाठी नावे दिली आहेत.

पंधरा मिनिटात आटपा… अर्थसंकल्पावर बोलण्यास नगरसेवकांना कोणतेही वेळेचे बंधन नाही. त्यामुळे ही चर्चा नेहमीच खूप दिवस चालते. यंदा मात्र आधीच उशारा सादर झालेला अर्थसंकल्प आणि त्यात लांबलचक भाषणांमुळे चर्चा खूपच लांबली आहे. तर अनेक नगरसेवकांमध्ये मी किती तास बोललो याचीही अहमहमिका लागली होती. त्यामुळे अखेर सोमवारपासून नगरसेवकांना पंधरा मिनिटात भाषण संपवण्याची मुदत घालण्यात आली आहे. अर्थसंकल्पावरील चर्चा २८ किंवा २९ एप्रिलला संपवण्याचे उद्दिष्ट सत्ताधाऱ्यांनी ठेवले आहे.

थेट प्रक्षेपणामुळे अति उत्साह … गेल्या आठवड्यापासून मुंबई महापालिकेच्या सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण यु ट्युबवरून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांना, मुंबईकरांना हे कामकाज थेट पाहता येत आहे. नगरसेवकांची भाषणे ऐकणे मतदारांना शक्य झाले आहे. त्यामुळे नगरसेवकही हातवारे करून, शेरोशायरी करून मोठमोठी भाषणे करून आपल्या मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या भाषणाची छोटी ध्वनीचित्रफित करून ती समाजमाध्यमांवर टाकण्याची हौस पूर्ण केली जात आहे.

दिवसभर कामकाज दरम्यान, अर्थसंकल्पावरील चर्चेच्या निमित्ताने सभागृहाचे कामकाज सकाळी ११ वाजल्यापासून रात्री उशीरापर्यंत सुरू असते. त्यामुळे इतका वेळ नगरसेवकांना, गटनेत्यांना सभागृहात बसून राहावे लागते आहे. त्यामुळे विभागातील कामे होत नाहीत, लोकांच्या भेटीगाठी होऊ शकत नाहीत अशीही तक्रार काही नगरसेवक करत आहेत.