मुंबई : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान प्रशासनाच्यावतीने उपस्थित असलेल्या उपायुक्त संध्या नांदेडकर या मोबाइलमध्ये व्यस्त असल्याबद्दल सदस्यांनी आक्षेप घेतला. सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळ झाला, सभागृहाचे कामकाज काही काळ थांबवावे लागले.
मुंबई महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा तब्बल ८०,९५२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पावर गेल्या काही दिवसांपासून महापालिका सभागृहात चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून ही चर्चा सुरू असून सकाळी ११ किंवा १२ वाजल्यापासून रात्री उशीरापर्यंत सभागृह सुरू असते. सभागृहात प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त उपस्थित असतात. तसेच कधीकधी उपायुक्त दर्जाचे अधिकारी देखील कधीकधी बसतात. शुक्रवारी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान अतिरिक्त आयुक्तांच्या खुर्चीवर उपायुक्त संध्या नांदेडकर बसल्या होत्या. सभागृहात चर्चा सुरू असताना त्या मोबाइलमध्ये व्यस्त होत्या. याला सर्व पक्षीय नगरसेवकांनी आक्षेप घेतल्यामुळे उपमहापौरांनी अतिरिक्त आयुक्तांना तातडीने सभागृहात बोलवण्याचे निर्देश देत, सभागृहाचे कामकाज तात्पुरते थांबवले. त्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळ झाला होता.
मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये २०२६-२७ आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर गेल्या आठवडाभरापासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे सभागृहात महापौर व उपमहापौरांच्या बाजूला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्तांना बसणे बंधनकारक आहे. पण अर्थसंकल्पीय चर्चा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहत असल्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी अन्य कामे करण्यासाठी सभागृहात तात्पुरत्या स्वरूपात बसण्याची जबाबदारी उपायुक्तांवर सोपवली आहे. त्यानुसार सभागृहात उपायुक्त आलटून-पालटून बसतात.
सभागृहामध्ये भाजपाचे वरिष्ठ नेते प्रवीण छेडा यांचे भाषण सुरू असताना उपस्थित असलेल्या उपायुक्त संध्या नांदेडकर मोबाइलमध्ये व्यस्त होत्या. त्यामुळे छेडा यांनी भाषण अर्धवट थांबवत नांदेडकर यांच्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावर सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी उपायुक्तांच्या कृतीचा निषेध केला. सभागृहात नगरसेवक बोलत असताना त्याची नोंद ठेवणे आवश्यक असताना उपायुक्त मोबाइलमध्ये कशा काय व्यस्त राहू शकतात, असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. यासंदर्भात उपायुक्तांनी माफी न मागितल्यामुळे उपमहापौर संजय घाडी यांनी सचिव विभागाला निर्देश देत अतिरिक्त आयुक्तांना सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. तोपर्यंत सभागृहाचे कामकाज होणार नाही, असेही उपमहापौरांनी ठणकावून सांगितले. अखेर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे सभागृहात दाखल झाले. त्यानंतर वादावर पडला पडला.
मुंबई शहराच्या विकासासाठी नगरसेवक आपले विचार सभागृहात मांडत असतात. यावेळी त्याची प्रशासनाने नोंद घेणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर प्रत्येक खात्याचे अधिकारीही सभागृहात उपस्थित असायला हवे, असे निर्देश यावेळी संजय घाडी यांनी दिले.
