मुंबई : रेल्वेच्या हद्दीत रुळांवर पाणी साचून रेल्वे ठप्प होऊ नये म्हणून यंदा पालिका प्रशासनाने कल्व्हर्टच्या सफाईकडे विशेष लक्ष दिले आहे. रेल्वेच्या हद्दीतील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेले सर्व कल्व्हर्ट साफ झाले असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे पालिकेचा दावा किती खरा ते येत्या पावसाळ्यातच समजू शकणार आहे.

चर्चगेटपासून पश्चिम उपनगरातील दहिसरपर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुलुंड, मानखुर्दपर्यंतचा रेल्वे रुळांचा भाग मुंबई महापालिकेच्या हद्दीत येतो. या रेल्वे रुळांवर विविध ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कल्व्हर्ट आहेत. पावसाळ्यापूर्वी हे नाले साफ करावे लागतात. दरवर्षी पालिका मध्य आणि पश्चिम रेल्वेला या कामासाठी निधी देत असते. रेल्वेच्या यंत्रणेने हे नाले साफ केले की नाही याची पाहणी करण्याची जबाबदारी यंदा अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. हे कल्व्हर्ट साफ झाले नाही तर रेल्वे रुळांवर पाणी तुंबण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदा पालिकेने ही खबरदारी घेतली आहे.

हेही वाचा : मुंबई: अश्लील चित्रफीत तयार करून १७ लाखांची खंडणी, घाटकोपर पोलिसांकडून गुन्हा दाखल

कल्व्हर्टच्या सफाईची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असली तरी हे कल्व्हर्ट साफ झाले की नाही याची खातरजमा करण्याचे काम पालिकेच्या अभियंत्यांना दिले होते. कल्व्हर्ट साफ झाले की नाही याची खातरजमा करून प्रमाणित करण्याकरीता अभियंत्यांना ३१ मेची मुदत दिली होती. एखाद्या ठिकाणी कल्व्हर्ट साफ झाले नसतील तर रेल्वेकडून ते स्वच्छ करून घ्यावे आणि रेल्वेने न केल्यास ते पालिकेच्या यंत्रणेकडून करून घ्यावे. तसेच कल्व्हर्ट स्वच्छ झाल्याचा अहवाल ३१ मेपर्यंत सादर करावा, अशी जबाबदारी पर्जन्यजलवाहिन्या विभागातील अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार बहुतांशी सर्व कल्व्हर्ट साफ झाल्याचे अभियंत्यांनी प्रमाणित केले आहे. केवळ पाच ठिकाणी सफाई झाली नव्हती. मात्र ते कल्व्हर्टही लवकरच साफ करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वेच्या हद्दीतील या कल्व्हर्टची स्वच्छता मनुष्यबळ वापरून करावी लागते. तसेच स्वच्छता करण्यासाठी पालिकेच्या यंत्रणेला रेल्वेच्या हद्दीत जाण्यास परवानगी नसते. त्यामुळे रेल्वेने स्वच्छता करून घेणे अपेक्षित आहे. रेल्वेच्या यंत्रणेने स्वच्छता केली की नाही याची पाहणी करण्याची जबाबदारी अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या हद्दीत चर्चगेट – दहिसरदरम्यान सुमारे ४० कल्व्हर्ट आहेत. तर मध्य रेल्वेच्या हद्दीत मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर तब्बल ७६ कल्व्हर्ट आहेत.

हेही वाचा : घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटना: जाहिरात कंपनीच्या माजी संचालकासह दोघांना अटक

तिन्ही रेल्वे मार्गांवर मिळून ११६ कल्व्हर्ट आहेत. त्यापैकी बहुतांशी कल्व्हर्ट स्वच्छ झाले आहेत. पाच ठिकाणी स्वच्छता नीट झाली नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तातडीने हे नाले रेल्वेच्या यंत्रणेकडून साफ करवून घ्यावेत किंवा पालिकेच्या यंत्रणेने साफ करावे, असे निर्देश दिले असल्याचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.