मुंबई : मुंबई महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत जिंकून आलेल्या २२७ नगरसेवकांपैकी तब्बल एक तृतीयांश नगरसेवकांच्या विजयाला त्यांच्या प्रतिस्पर्धींनी आव्हान दिले आहे. जातीबाबत चुकीची माहिती देणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवणे, अन्य माहिती लपवणे अशा विविध कारणांच्या आधारे या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक याचिका या कार्यकाळात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या याचिकांचे निकाल वेळवर लागले तर सत्तापालटही होऊ शकतो इतका हा आकडा मोठा आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारी २०२६ मध्ये पार पडली आणि त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी महापालिकेत पुन्हा एकदा सत्ता स्थापन झाली. मात्र निवडून आलेल्या २२७ नगरसेवकांपैकी तब्बल ७९नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान देण्यात आले असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. तर हा आकडा ८४ असल्याचा दावा काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केला आहे.
म्हात्रे यांनीही प्रभाग क्रमांक १ मधून निवडणूक लढवली होती. प्रभाग १ मधून निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविकेविरोधात म्हात्रे यांनीही याचिका दाखल केली आहे. अनेक प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहेत. उपलब्ध माहितीनुसार एका प्रकरणात लघुतम न्यायालयाने याचिका फेटाळून लावली असून उर्वरित प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रथमच मोठ्या संख्येने याचिका
सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांच्याही विरोधात या याचिका आहेत. यामध्ये अनुभवी नगरसेवकांच्या विरोधातही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. तर अनेक अनुभवी नगरसेवकांना हरवून सभागृहात बसलेल्या नगरसेवकांविरोधातही या याचिका आहेत. नगरसेवक पदाच्या पाच वर्षांच्या कालावधीच्या आधी या सर्व याचिकांचे निकाल लागले आणि ते याचिकाकर्त्यांच्या बाजूने लागले तर सत्तेतील गणितेही बदलतील इतका हा आकडा मोठा आहे.
आतापर्यंत जेमतेम दहा नगरसेवकांच्या विजयाला आव्हान दिले जात असे. त्यातून हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या नगरसेवकांचे नगरसेवक पद बाद होत असे. गेल्या २०१७ ते २०२२ च्या कार्यकाळात सहा नगरसेवकांचे पद रद्द झाले होते. त्यामुळे एकसंघ शिवसेनेला त्याचा लाभ झाला होता. त्यांच्या जागा ८४ वरून ९० झाल्या होत्या.
एवढ्या मोठ्या संख्येने याचिका दाखल झाल्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.काँग्रेसच्या अनुभवी माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनीही प्रभाग क्रमांक १ च्या विजयी नगरसेविकेविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्याप्रमाणेच ८० हून अधिक पराभूत उमेदवांरांनी याचिका दाखल केल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली.
या याचिकांमध्ये सर्वात जास्त जातीचे दाखले हे जात प्रमाणपत्राशी संबंधित आहेत. या सगळ्या याचिका लघुवाद न्यायालयात आहेत. या प्रकरणी सगळेच जिंकून आलेले नगरसेवक चुकीचे आहेत असे माझे मत नाही, असेही त्या म्हणाल्या. २२७ पैंकी ८० तक्रारी आहे मग त्यातील ४० जरी याचिका जिंकल्या तरी सत्तापालट होऊ शकतो असा मुद्दा म्हात्रे यांनी मांडला. अनेक याचिकांमध्ये सुनावणीच्यावेळी तारीख वर तारीख मिळते. सत्ताधाऱ्यांना सत्ता जाईल याचीच भीती वाटते आहे म्हणून निर्णय येत नाही, असाही आरोप म्हात्रे यांनी केला.
