मुंबई : मागील तीन वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेने आपल्या शाळांच्या इमारती धोकादायक बनल्यामुळे सुमारे ३५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत स्थलांतरित केल्याचे निदर्शनास आले आहे. न्यू माहीम स्कूल, कुलाबा व घाटकोपरमधील शाळांपाठाेपाठ आता मुंबई महानगरपालिकेने वरळीच्या समुद्र किनाऱ्यासमोर असलेली शाळा धोकादायक घोषित करून ६०० विद्यार्थ्यांना अन्य शाळेमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेने मागील वर्षी माहीम येथील ‘न्यू माहीम स्कुल’ या शाळेची इमारत धोकादायक ठरवत येथील विद्यार्थ्यांना धारावी, तसेच इतरत्र शाळांमध्ये हलविले. या शाळेची इमारत धोकादायक इमारतीच्या श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे या शाळेत शिकत असलेल्या सुमारे १५०० विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये हलविण्यात आले. स्थलांतरित केलेली शाळा ही विद्यार्थ्यांच्या घरापासून फारच दूर असल्याने त्यांना शाळेत जाण्यासाठी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ चालत जावे लागत होते.
शाळा लांब असल्याने विद्यार्थी व पालकांची गैरसोय होत होती. त्यानंतर कुलाबा येथील महापालिकेची शाळा धोकादायक घोषित करून या शाळेतील ११०० विद्यार्थ्यांना महानगरपालिकेच्याच आसपासच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले. त्यापाठोपाठ घाटकोपरमधील टिळक रोड शाळेची इमारत विद्यार्थ्यांसाठी असुरक्षित असल्याचे सांगत पालिकेने येथील सुमारे ४०० विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये पाठवले. पवई येथील पाचपोली भागात असलेल्या दोनपैकी एका शाळेतील विद्यार्थी पालिकेने दुसऱ्या शाळेत वर्ग केले.
मुंबई महानगरपालिकेने टप्प्याटप्याने या शाळा धोकादायक ठरवत त्यामधील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत स्थलांतरित केल्यानंतर आता वरळी समुद्रकिनाऱ्यासमोरील महानगरपालिका शाळेच्या इमारतीचे डिसेंबरमध्ये संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात आले. या लेखापरीक्षणच्या अहवालानुसार ही इमारत सी २ बी श्रेणीत असून या श्रेणीनुसार संबंधित इमारतीमध्ये दुरुस्तीची काम करून ती पुन्हा वापरात आणता येऊ शकते. मात्र, महानगरपालिकेने या शाळेतील इयत्ता सहावी ते दहावीच्या सुमारे ६०० विद्यार्थ्यांना जवळच्या सासमिरा शाळेमध्ये स्थलांतरित करण्याबाबतच्या सूचना पालकांना दिल्या आहेत.
पालकांकडून संताप व्यक्त
शाळांना २ मेपासून उन्हाळ्याची सुटी सुरू होणार आहेत. या कालावधीत महानगरपालिकेने या शाळेच्या डागडुजीचे काम पूर्ण करावे. त्यामुळे विद्यार्थांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. तसेच जूनपासून मुले त्याच शाळेत शिकू शकतात, असे पालकांकडून सांगण्यात आले. सासमिरा महानगरपालिकेच्या शाळेत अनेक सोयी-सुविधा नसल्याचे सांगत पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेचे म्हणणे
संबंधित शाळा इमारतीची संरचनात्मक तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करता त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना जवळच्याच शाळांमध्ये स्थलांतरित केल्याने त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
