झाडांच्या आरोग्यासाठी वृक्ष संगोपनतज्ज्ञ

फोर्ट परिसरात प्रायोगिक तत्त्वावर हे संगोपनतज्ज्ञ काम करणार आहेत.

मुंबई महापालिकेने मुंबईतील झाडांची निगा राखण्यासाठी व त्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी वृक्ष संगोपनतज्ज्ञ नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

आकार, सौंदर्य राखण्यासाठी पालिकेचा निर्णय

चहुबाजूंनी पसरलेल्या डेरेदार झाडांचे सौंदर्य पाहण्याजोगे असते. पण मुंबईसारख्या शहरांत रस्त्याच्या कडेला कशीबशी एका बाजूला कलत उभी राहिलेली झाडेच पाहायला मिळतात. प्रतिकूल परिस्थितीत जशी जागा मिळेल तशी ही झाडे वाढत, खुंटत असल्याने ती भेसूर दिसतात. हेच चित्र पालटण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईतील झाडांची निगा राखण्यासाठी व त्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी वृक्ष संगोपनतज्ज्ञ नेमण्याचा निर्णय घेतला आहे. फोर्ट परिसरात प्रायोगिक तत्त्वावर हे संगोपनतज्ज्ञ काम करणार आहेत.

दक्षिण मुंबईतील पुरातन वारसास्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महापालिकेकडून योजना आखली जात आहे. त्यानुसार महापालिका इमारत, फ्लोरा फाऊंटन, काळा घोडा या परिसरातील पदपथ मोकळे आणि सलग करणे, अनावश्यक फलक काढून टाकणे, दुकाने – उपाहारगृहांना एकाच आकाराचे फलक बसवणे, बसथांब्यांचा आकार कमी करणे, दिव्यांचे खांब रेखीव करणे, बाक हटवणे अशा कामांचा समावेश आहे. त्यातच या परिसरातील बागांमधील तसेच रस्त्यांवरील झाडांची निगा राखून त्यांची शास्त्रीयदृष्टय़ा व एका उंचीवर – योग्य आकारात छाटणी करण्यासाठी महापालिकेकडून वृक्ष संगोपनतज्ज्ञ (अबरेरिस्ट/ ट्री सर्जन) नेमण्याचा विचार सुरू आहे. पदपथावरील झाडांभोवती एक मीटर परीघ आखणे, फोर्ट परिसरातील बागांचे व्यवस्थापन करणे, झाडांचे आरोग्य तपासणे, त्यांची निगा राखणे व त्यांच्या पर्णसांभाराला आकार देण्यासाठी हे सर्जन नेमले जाणार आहेत. त्यामुळे या भागाचे सौंदर्य अधिक वाढेल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिकेकडून पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग केला जाणार आहे.

फोर्ट परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यातून पदपथ व वृक्षांची शोभा वाढवण्यासाठी खर्च केला जाणार आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडून संमती मिळाल्यावर यासंबंधी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

‘इतर भागांतील झाडांची काळजी घ्या’

फोर्ट परिसरासाठी वृक्षतज्ज्ञ नेमताना शहरातील इतर भागातील झाडांची शास्त्रीय दृष्टिकोनातून काळजी घेतली गेली पाहिजे. चेंबूर येथे नारळाचे झाड पडून महिलेचा मृत्यू झाला. ते झाड नेमके का पडले, शहरातील इतर झाडे का पडतात, त्याबद्दल शास्त्रीय दृष्टिकोनातून माहिती गोळा केली तर अशी पडझड रोखता येईल. त्याचप्रमाणे पावसाळ्याआधी छाटणी करताना, वृक्षारोपण करताना पालिकेच्या उद्यान विभागातील अधिकारी, जे स्वत वृक्षतज्ज्ञ असतात उपस्थित राहिले तरी झाडांना लाभ होईल, असे वृक्ष अभ्यासक चंद्रकांत लट्टू म्हणाले.

‘अबरेरिस्ट’ म्हणजे कोण?

झाडांची लागवड, आरोग्य, व्यवस्थापन याबाबत काम करणाऱ्या व्यावसायिक वृक्ष संगोपनतज्ज्ञांना ‘अबरेरिस्ट’ म्हणतात. शहरातील बागा, रस्त्यांवरील झाडांचे सौंदर्य खुलवण्यात ते निष्णात असतात.

हा परिसराचे सौंदर्य वाढावे व पर्यटकांना त्याचा आनंद घेता यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कशाही पद्धतीने वाढलेल्या झाडांमुळे त्याच्या मागे उभ्या असलेल्या पुरातन, सुंदर इमारतींच्या देखणेपणालाही मर्यादा येतात. त्यामुळे छाटणी करून झाडांना नीट आकार देण्यासाठी तसेच झाडांची निगा राखण्यासाठी वृक्षतज्ज्ञांना नेमण्याचा विचार सुरू आहे. 

– आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai municipal corporation decided to appoint tree consultant to maintain beauty