मुंबई : पवई येथील फुकट नगर आणि मिलिंद नगर परिसरातील सुमारे २५० अनधिकृत बांधकामांवर मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ प्रशासकीय विभाग (वॉर्ड) आणि जल अभियंता विभागामार्फत संयुक्तपणे निष्कासनाची कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाच्या जमिनीवर ही अनधिकृत बांधकामे उभी राहिली होती.
पवईच्या फुतट नगर आणि मिलिंद नगर परिसरात शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुंबई महापालिकेने ही कारवाई केली. अतिक्रमित जागा अतिक्रमणमुक्त करून तिचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘परिमंडळ ६’च्या उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि एस विभागाचे सहायक आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
कारवाईसाठी सुमारे १५० पोलीस कर्मचारी, ‘एस’ विभाग आणि जल अभियंता विभागातील सुमारे ५० अभियांत्रिकी अधिकारी व कर्मचारी, २०० मजूर तैनात होते. तसेच ७ जेसीबी, १० डंपर आणि इतर लहान मालवाहू वाहनांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान अनधिकृत बांधकामे हटवून जागा पूर्णपणे मोकळी करण्यात येत आहे. अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया पूर्ण होताच संबंधित जागेभोवती कुंपण उभारण्याचे कामही तातडीने हाती घेण्यात येणार असून, पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत. दरम्यान, शासकीय व महानगरपालिका मालकीच्या जागांवरील अतिक्रमणांविरोधातील कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
