मुंबई : पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि फळगाड्यांवर कारवाई करण्याची मोहीम मुंबई महापालिकेने हाती घेतली आहे. या कारवाईला मंगळवारी रात्रीपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी ३५० ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ८३ चारचाकी हातगाड्या, स्वयंपाकाचे १०५ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. तसेच या कारवाईदरम्यान अन्य सामानही जप्त करण्यात आले. पुढील काही दिवस संध्याकाळी ७ ते रात्री १० या वेळेत संपूर्ण मुंबईत ही कारवाई होणार आहे.

रस्त्यावर, उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करून ते विकणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्याची मोहीम पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. ही कारवाई प्रभावीपणे करण्यासाठी प्रत्येक परिमंडळात पथक स्थापन करण्यात आले आहे. एका परिमंडळातील पथक दुसऱ्या परिमंडळात जाऊन कारवाई करणार आहे. त्यानुसार मंगळवारी या कारवाईला सुरूवात झाली. सातही परिमंडळात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत जप्त करण्यात आलेले सामान पालिकेच्या गोदामात जमा करण्यात आले आहे.

हेही वाचा…“बऱ्याच वर्षांपासून गृहखातं असल्याने, त्यांचा अन्…”; फडणवीसांच नाव न घेता भास्कर जाधवांची खोचक टीका!

गेल्या महिन्यात उघड्यावरील खाद्यपदार्थ खाल्यामुळे विषबाधा झाल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. गोरेगावमध्ये २६ एप्रिल रोजी शोर्मा खाल्यामुळे १० जणांना विषबाधा झाली होती. तर मानखुर्द परिसरात ७ मे रोजी पिझ्झा, बर्गर खाल्यामुळे एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिकेने मानखुर्द परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई हाती घेतली आहे. मंगळवारपासून पुढील आठ ते दहा दिवस ही कारवाई करण्यात येणार आहे. पालिकेचे उपायुक्त (विशेष) यांनी याबाबतचे निर्देश संबंधित पालिका यंत्रणेला दिले आहे. त्यानुसार ही कारवाई करून फळविक्रेत्यांच्या गाड्या, खाद्यपदार्थ बनवून विकणाऱ्या फेरीवाल्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर, हातगाड्या आणि अन्य सामान जप्त करण्यात आले.

हेही वाचा…मुंबई : जे. जे. रुग्णालयातील रुग्ण कक्ष होणार अद्ययावत, पुढील वर्षापर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

या कारवाईसाठी परिमंडळ निहाय सात पथके तयार करण्यात आली आहेत. या कारवाईत खाद्यपदार्थांच्या गाड्या, सामान, स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर आदी जप्त करण्यात येणार आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.