BMC Election Results Updates 2026: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. त्यानंतर आज सकाळपासून याच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलानुसार यामध्ये भाजपाच्या नेतृत्त्वाखालील महायुती सध्या आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर ठाकरे बंधूंच्या शिवसेना-मनसे युतीची कामगिरी निराशाजन होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजपा: ८९
शिवसेना यूबीटी: ६५
शिवसेना: २९
काँग्रेस: २४
मनसे: ६
एमआयएम: ८
एनसीपी एपी: ३
एनसीपी: १
कोणत्या पक्षाला किती टक्के मते?
भाजपाने सर्वाधिक २१.५८% मतांचा वाटा मिळवला, त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) १३.१३% मते मिळाली. शिवसेना ५% मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिली, तर काँग्रेसला ४.४४% मते मिळाली.
लहान पक्षांमध्ये, मनसेला १.३७% आणि एआयएमआयएमला १.२५% मतांचा वाटा मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसला ०.४५%, समाजवादी पक्षाला ०.२८% आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला ०.२२% मते मिळाली.
२०१७ मधील मतदानाची टक्केवारी
२०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्रित शिवसेनेने ८४, भाजपा ८२, काँग्रेस ३१, राष्ट्रवादी ९, मनसे ७ आणि इतर उमेदवारांना १४ जागांवर विजय मिळाला होता. ८४ जागांसह शिवसेना (ठाकरे गट) सर्वात मोठा पक्ष ठरला होता. या निवडणुकीत मुंबई पालिका निवडणुकीत भाजपाने प्रथमच जोरदार मुसंडी मारली होती. कारण २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपा अवघ्या ३१ जागा जिंकली होती.
पक्षनिहाय मिळालेल्या टक्केवारीच्या बाबतीतही शिवसेनाच आघाडीवर होती. शिवसेनेला २८.०३ टक्के मते मिळाली होती. यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपाला २७.०४ टक्के मते मिळाली होती. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ७.७ टक्के मिळाली होती. तसेच अविभाजित राष्ट्रवादीला ४ टक्के आणि इतरांना १५. ७ टक्के मते मिळाली होती.
एक्झिट पोचला अंदाज काय होता?
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत काल (१५ जानेवारी) जेव्हीसी, एक्सिस माय इंडिया-आज तक, प्राब आणि जनमत यांचे एक्झिट पोल्सचे कल समोर आले होते. या कलानुसार मुंबईत महायुती सत्ता मिळवेल असे सांगण्यात आले होते. मुंबई मनपाच्या २२७ जागांमध्ये बहुमताचा आकडा ११४ आहे. यापैकी जवळपास सर्वच एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार महायुतीला यश मिळ्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
