निवडणुकीच्या काळात मुंबई पुन्हा भेटते. नि आपल्याला फिरवून आणते. गेले दहा-बारा दिवस ही फिरस्तेगिरी सुरू होती. सकाळी वही-पेन घेऊन बाहेर पडायचं. झोळीत बिस्किटचा पुडा आणि पाण्याची बाटली, इलेक्ट्रॅाल. वाट मिळेल तिथं चालू लागायचं. कितीतरी लोक. पुष्कळ, भरमसाठ लोक. समुद्रात जेवढे मासे तेवढी मुंबईत माणसं. बाहेरून आलेले लोक आता बाहेरून येणाऱ्या लोकांना कंटाळलेत. सगळे जगण्याच्या खेचाखेचीत सोलपटून निघालेत. पंधरा-वीस हजार पगारवाला माणूस चिंतेत नि दोनशे कोटीचे पाचशे कोटी करू पाहणारादेखील विवंचनेत. सब घोडे बारा टक्के.लोकांचे नागरी प्रश्न तर सुटलेले नाहीतच. शिवाय लोकांना नवेनवे सवाल सतावताहेत. वैष्णवदेवीची फुकट ट्रिप मिळेल काय ? वॅाशिंग मशीन, घरघंटी फुकट मिळेल काय ? कांदिवलीतल्या एका बहुमजली टॅावरमधल्या हाय-फाय रहिवाशांनी एका उमेदवाराकडे मेजवानीची मागणी केली म्हणतात.
धारावीचा कार्यकर्ता सेहरान खान म्हणतो, “लोक राजकारण्यांकडून पैसे, वस्तू मागतात त्यात चूक काय ? राजकारणी लोक पाच वर्षं बेसुमार पैसा करतात ना ? मग निवडणुकीच्या वेळी पैसा काढा ना बाहेर.”सेहरानला विचारलं, “तुझा उमेदवार कोण ? काय करतो ?”
“ते समाजसेवक आहेत,” तो म्हणाला. नंतर कळलं की, उमेदवाराचा डान्स बार आहे.पैसा सढळ हातानं वाटतो म्हणून राज्याच्या एका ज्येष्ठ मंत्र्यावर बरेच लोक खूष आहेत. मंत्री पैसे करतात याचं पब्लिकला वाईट वाटत नाहीए; त्यानं ते धन उदार अंत:करणानं वाटलं पाहिजे.
सायन-कोळीवाड्याच्या कुठच्याशा आडवस्तीत गेले होतो. रात्रीची वेळ. बराच काळोख. रस्त्यावरचे दिवे गायब. त्या प्रभागातली सिस्टिम अशी की, महापालिकेची स्वच्छतागृहं तिथं स्थाईक झालेले बांगलादेशी चालवतात नि नागरिकांकडून पैसे घेतात. त्यांतला पन्नास टक्के हिस्सा नगरसेवकांचा.थोडक्यात, राजकारण्यांनी बांगलादेशी मायग्रंट्सना ओलीस धरलंय. एक स्थानिक कार्यकर्ता हे सगळं पोटतिडिकेनं सांगत होता. भाबडा बिचारा. त्याच्या पक्षाध्यक्षाला बड्या उद्योगपतीकडून मोठं घबाड मिळालं होतं म्हणतात.
निवडणुकीत म्हटलं-ऐकलं असंच सुरू असतं.एक ओळखीचा कार्यकर्ता म्हणाला, “उमेदवाराच्या परिचयपत्राची व्यवस्थित पाकिटाप्रमाणे घडी करून त्यात पैसे कोंबायचे नि ते पाकिट दाराच्या फटीतून आत सरकवायचं. हे काम दिवसा करायचं. पुरुष मंडळी कामावर गेलेली असतात नि स्त्रिया सैंपाकात असतात. त्या दुपारी वगैरे ते पाकिट पाहतात नि गपगार बसतात.”
आम्हां फिरस्तेगिरी करणाऱ्या बातमीदारांना जी माणसं, कार्यकर्ते भेटतात ती निवडणूक किंवा पोलीस अधिकाऱ्यांना का भेटू नयेत ?
बरेच वॅार्ड फिरलो. स्त्रियांचा सहभाग हे या निवडणुकीचं मोठं वैशिष्ट्य लक्षात यायला वेळ लागला नाही. पदयात्रा असो वा चौक सभा महिलांची मोठी संख्या दिसायची. अतिशय उत्साहाचा सहभाग. काही वॅार्डातल्या महिला उमेदवार हुशार, आणि समंजस वाटल्या. “निवडून आल्यावर घरातल्या पुरुष मंडळींच्या आदेशानुसार काम करणार काय ?” असं दक्षिण-मध्य मुंबईतल्या एका महिला उमेदवाराला विचारलं.“सगळं शिकून घेतल्यावर पुरुष मंडळींचं ऐकण्याची गरज काय ?” तिनं हसत हसत मलाच विचारलं.
मला मागचा काळ आठवला.मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, प्रमिला दंडवते, इंदुमती पटेल, अलका देसाई, प्रमिला बच्छाव, शालिनी कुलकर्णी, पुष्पा वागळे या नगरसेविका घरातल्या पुरुषमंडळींना घेऊन महापालिकेत कधी दिसल्या नाहीत.
अंगावर टनावारी सोनं आणि गळ्यात नवऱ्याचा किंवा भावाचा पट्टा ही हिडिस पद्धत १९९२ नंतर सुरू झाली. ती या खेपेला संपली तर सोन्याहून पिवळं.कार्यकर्त्यांची एक नवी पीढी पुढे आलीए. कामाची पद्धत पूर्णपणे बदललीए. सगळं डिजिटल झालंय. काही पक्षांकडे, उमेदवारांकडे पगारी टीम आहे; तर काही पक्षात राबणारे कार्यकर्ते अद्याप तग धरून आहेत. पक्षाच्या मालकांना त्यांचं काही पडलेलं नसतं.
पोस्ट, पॅाडकास्ट, रील वगैरे खेळ जोरात सुरू आहेत. सगळ्या नगरसेवकांचं एक बॅक ॲाफिस असतं. तिथं तरुण मुलं-मुली खुडबुड खुडबुड करत असतात.मुंबई वाट्टेल तशी फुगलीए नि जागोजागी फाटलीए. परवा गोरेगावच्या पांडुरंगवाडीत वाहनगर्दीत आम्ही जाम अडकलो. पुढे जाताच येईना. पाच-सहा गाडीवाले आपाल्या गाडीतून पटापट उतरले नि ट्रॅफिक पोलिसाचं काम करू लागले. स्थानिक कार्यकर्त्यांचा, अधिकाऱ्यांचा पत्ता नव्हता. गांधी हेच तर म्हणत होते. नागरिकांनी स्वत: आपलं शहर चालवावं.
एकाही नगरसेवकाला आख्खी मुंबई समजलेली नाही. समजून घ्यायचीही नसते. सगळ्या पक्षाचे एकजात सगळे उमेदवार फक्त आपापल्या वॅार्डपुरता विचार करतात. त्यामुळे पूर्ण मुंबईचं एक रेखीव चित्र लोकांच्या मनात सजीव होतच नाही.आम मतदारांचा अडाणीपणा तर अद्भुत. नागरी शिस्त, नागरी मूल्यांशी काही देणंघेणं नाही. जबाबदारीची जाणीव नाही. आपण एका मोठ्या गौरवशाली शहराचे नागरिक आहोत ही समज नाही. प्रजा म्हणून जगण्याची खोड जात नाहीए. मायबाप सरकार जे देईल ते घ्यायचं. घरघंटी, फुकट तीर्थयात्रा, वॅाशिंग मशीन.
लोकशाहीचं दैन्य दर्शवणारा डॅा. इक्बाल यांचा एक मार्मिक शेर आहे :
जम्हुरियत इक तर्ज-ए-हुकुमत है कि जिस में वोटों को गिना जाता है, तोला नहीं जाता
(लोकशाही एक पद्धत आहे नि तीत वोट मोजले जातात, मताचं वजन काय ते लक्षात घेतलं जात नाही.) या निवडणुकीत ना कुण्या पक्षाचा चेहरा धडपणे दिसला, ना कुणा नेत्याचा. ‘एक चेहरे पे कई चेहरे’ असं बाष्कळ राजकारण सगळे करत बसले. स्वच्छ, टवटवीत चेहरा दिसणार कसा ? एके काळी मुंबई नि डांगे असं समीकरण होतं, नंतर जॅार्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब ठाकरे. विचारसरणी काहीही असो, पण हे नेते खमके नि (माझ्यासारखे) अट्टल मुंबईकर होते.दुसरं, निवडणुकीच्या अजेंड्याचादेखील नीटसा अर्थबोध होत नाहीए. काही पक्षविकासाचं म्हणताहेत, परंतु मुंबईची वाहनगर्दी आहे तशीच आहे. वाहनं ढिम्म हलत नाहीत. कोस्टल रोडवरून वीस मिनिटांत वांद्र्याला आलो की, हजारो वाहनं उपाशी मगरींप्रमाणे जबडे उघडे टाकून पुढे सरसावतात. बोरीवलीहून रेल्वेनं एक तास पाच मिनिटांत चर्चगेटला पोचणं आजही सहज शक्य आहे. कारनं अडीच तास लागतात. मुंबई सतत खोदून ठेवणं हा जर विकास असेल तर तो कंत्राटदारांचा आहे. आम माणसांचा नाही.मध्येच गौतम अदाणी आले — हिंदी सिनेमात अचानक ललिता पवार उगवातात, तसे. याचा अर्थ एवढाच की, मोठे, धनाढ्य उद्योगपती महागड्या, चैनबाज मुंबईचा आराखडा तयार करत असतात नि राज्यकर्ते, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत तो राबवत असतात. सब घोडे बारा टक्के.
पूर्वी, म्हणजे मी बातमीदारीत आलो तेव्हा एखादा रस्ता खोदायचा असला तर दर्शनी भागी एक पाटी लावलेली असायची : रस्ता कधी खोदला नि ते काम पूर्ण कधी होणार त्या तारखा बोर्डावर लिहिलेल्या असायच्या.जमशेटजी जीजीभॅाय हे एकोणिसाव्या शतकातले मोठे उद्योगपती. अफूच्या व्यापारात त्यांनी कोट्यवधी कमावले असं म्हणतात. पुढे त्यांनी आपल्या पत्नीसाठी माहिम कॅाज-वे बांधला. नि तो आख्ख्या मुंबईच्या फायद्याचा ठरला. काळ बदलला असं सगळेच म्हणत असतात.काल रात्री एका नगरसेवकाच्या समाजसंवाद टीमचा मला मेसेज आला : ‘रात्र वैऱ्याची आहे, जागा रहा.’ मी पोटभर हसलो नि झोपी गेलो. कसले वैरी नि कोण मित्र ? सब घोडे बारा टक्के.
ज्येष्ठ लेखक व मुक्त पत्रकार
ambarish.ipad@gmail.com
