मुंबई : गेल्या तब्बल पावणे चार वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू असलेल्या मुंबई महापालिकेत नव्या वर्षात महापालिकेची नवनिर्वाचित सत्ता स्थापन होणार आहे. गेले वर्षभर निवडणूकीची प्रतीक्षा करण्यात गेले असताना वर्षाची सांगता मात्र निवडणूकीच्या रणधुमाळीने होणार आहे. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर निवडणूकीची पुढील प्रक्रिया थेट नव्या वर्षातच होणार आहे. त्यामुळे येत्या वर्षात मुंबई महापालिकेच्या वर्तुळात पुन्हा एकदा लोकाभिमुख कारभार सुरू होणार आहे.
मुंबई महापालिकेची मुदत मार्च २०२२ मध्ये संपल्यापासून गेली तब्बल पावणे चार वर्षे मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. गेले वर्षभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची चर्चा सुरू होती. मात्र प्रत्यक्षात निवडणूकीची रणधुमाळी सुरु होण्यास डिसेंबर महिना उजाडला. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर २ जानेवारीला अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे ३१ डिसेंबर व १ जानेवारी असे दोन दिवस निवडणूक प्रक्रिया थांबली असली तरी राजकीय स्तरावर घडामोडी होणार असून नव्या वर्षाची सुरूवात प्रचाराने होणार आहे.
संपूर्ण वर्षभर मुंबई महापालिकेत प्रशासकांची राजवट होती. तरीही हे वर्ष विविध घटनांनी गाजले. रस्ते काँक्रीटीकरणाची २०२३ मध्ये सुरू झालेली कामे यंदाही सुरू होती. यावर्षी मोठ्या प्रमाणावर कॉंक्रीटीकरणाची कामे हाती घेतल्यामुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. रस्ते काँक्रीटीकरणाचा विषय थेट अधिवेशनापर्यंत पोहोचला होता. यावर्षी नालेसफाईत मुंबई महापालिकेने एआयचा वापर केला व कंत्राटदारांवर चाप बसवण्याचा प्रयत्न केला. प्रदूषणाच्या नियमावलीमुळे यंदाच्या वर्षी लाकडावर चालणाऱ्या बेकरींना वि्दयुत बेकऱ्या सुरू करण्याचा पर्याय देण्यात आला.
वाढत्या पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या गारगाई धरण प्रकल्पाला अखेर १० वर्षांनंतर हिरवा दिवा मिळाला. प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या पाणीसाठ्यात दररोज तब्बल ४४० दशलक्ष लिटरने वाढ होणार आहे.
७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प
श्रीमंत मुंबई महापालिकेने चालू आर्थिक वर्षासाठी तब्बल ७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प जाहीर केला. पण त्याचवेळी मुंबईकरांवर कचरा शुल्क लावण्याचेही सुतोवाच केले. तसेच मुंबई महापालिकेवर दोन लाख ३२ हजार कोटींचे दायित्व असल्याचेही जाहीर केले. त्यामुळे मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती येत्या काही वर्षात खालावणार असल्याचाही अंदाज यावर्षी आला. तसेच यावर्षी मुंबई महापालिका प्रशासनाने महसूल वाढीसाठी तीन भूखंड लिलावाने देण्याची प्रक्रिया सुरू केली.
पीओपीच्या गणेशमूर्तींमुळे यंदा गणेशोत्सव गाजला
पीओपीच्या गणेशमूर्तींवर न्यायालयाने घातलेल्या बंदीमुळे यंदाचा गणेशोत्सव गाजला. सरसकट बंदी मागे घेतली तरी त्यावर पालिकेने केलेल्या अंमलबजावणीमुळे यंदाचा गणेशोत्सव मुंबई महापालिकेसाठी आव्हान ठरला. माघी गणेशोत्सवातील चार मूर्तींचे विसर्जन सहा महिने रखडले होते.
