मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढल्यानंतर मुंबईतील २२७ प्रभागांचे चित्र स्पष्ट झाले. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असले तरी सोडतीमध्ये काही विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की इच्छुक पुरुष उमेदवारांचे प्रभाग आरक्षित झाले आहेच, पण आजूबाजूचेही प्रभाग आरक्षित झाले आहेत. त्यामुळे पुरुष उमेदवारांना प्रभागच नाही अशी स्थिती आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी २२७ प्रभागांंसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. या प्रभागांचा विधानसभा मतदारसंघनिहाय विचार केल्यास प्रत्येक मतदारसंघात साधारणत: पाच ते सहा प्रभाग येतात. मात्र काही विधानसभा मतदारसंघात पाच ते सहा प्रभागांपैकी बहुतांशी प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत. सोडतीमुळे महिला आरक्षण असमतोल झाले असून काही विधानसभा मतदारसंघात पुरुष उमेदवारांना प्रभागच उरलेले नाहीत. त्यामुळे बाजूच्या मतदारसंघासाठी प्रयत्न करण्याचा पर्यायही या ठिकाणी उरलेला नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवार आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी करीत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांकडेही एकाच विधानसभा मतदारसंघात इतक्या महिला उमेदवार नाहीत.
उत्तर मुंबईतील दहिसर, बोरिवली, मागाठाणे या मतदारसंघात एकूण २० प्रभागांपैकी केवळ पाच प्रभाग खुले आहेत. तर १२ प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. अन्य प्रभाग ओबीसी, एससी यांच्यासाठी राखीव आहेत. तर भांडुपमध्ये पाच प्रभागांपैकी चार प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत.
शीव कोळीवाडा येथील पाचही प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनाही फटका बसला आहे. तर वरळीमध्येही सातपैकी पाच प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. वरळी हा शिवसेना (ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला असून येथील अनेक प्रभागांमध्ये शाखाप्रमुखांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्यामुळे या सर्व इच्छुक पुरुष उमेदवारांना आता पर्यायच उरलेला नाही. घाटकोपर पश्चिममध्ये सहा प्रभागांपैकी पाच प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत.
घाटकोपर पश्चिम – सहापैकी पाच प्रभाग महिलांसाठी राखीव.
भांडूप – पाचपैकी चार प्रभाग महिलांसाठी राखीव.
दहिसर – सहापैकी पाच प्रभाग महिलांसाठी राखीव.
शीव कोळीवाडा – पाच प्रभाग महिलांसाठी राखीव.
वरळी – सातपैकी पाच प्रभाग महिलांसाठी राखीव.
बोरिवली – सर्वच सहा प्रभाग महिलांसाठी राखीव.
