मुंबई: मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा ३३ हजार रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) देण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र गेल्या सहा वर्षांचा विचार केला तर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात ११२ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२० मध्ये साडे पंधरा हजार रुपये असलेले अनुदान यंदा ३३ हजारावर गेले आहे. निवडणूका, राज्यातील सत्तापालट, राजकीय हस्तक्षेप यामुळे अनुदानाच्या रकमेत भरघोस वाढ झाली आहे. आस्थापना खर्च कमी करण्याच्या ऐवजी राजकारण्यांमधल्या चढाओढीमुळे कामगारांचा मात्र फायदा झाला असून पालिकेच्या तिजोरीवरी ताण मात्र वाढू लागला आहे.

मुंबई महापालिकेत सुमारे ९० हजारापेक्षाही अधिक कर्मचारी आहेत. मुंबई महापालिकेला बोनस कायदा १९७२ लागू होत नाही. त्यामुळे कामगार, कर्मचारी, अधिकारी यांना स्वखुशीने सानुग्रह अनुदान दिले जाते. २०२० मध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांना साडे पंधरा हजार रुपये अनुदान दिले जात होते. तोपर्यंत दरवर्षी पाचशे रुपये वाढ दिली जात असे. मात्र गेल्या पाच वर्षात दिवाळी अनुदानाच्या रकमेत १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. यंदा दिवाळी अनुदानामुळे पालिकेवर ३०० कोटींचा ताण येण्याची शक्यता आहे. दरवर्षी दिवाळी आली की मुंबई महापालिकेत विविध कामगार संघटना अनुदानाची मागणी करतात. प्रशासन ही मागणी अमान्य करतात.

मग सत्ताधारी पक्ष त्यात हस्तक्षेप करतात आणि अनुदानाची रक्कम जाहीर करतात. ही दरवर्षीची प्रथा आहे. जास्तीत जास्त अनुदानाची मागणी करणाऱ्या कामगार संघटना आणि जास्तीत जास्त अनुदान जाहीर करणारे राजकारणी यामुळे मुंबई महापालिकेवरील अनुदानाचा ताण वाढतो आहे.

अशी झाली बोनस वाढ

आर्थिक .बोनस (रुपये)…..वाढ २०२०……१५,५००…..पाचशे रुपये … २०२१……२०,००० ….पाचशे रुपये …. २०२२ …..२२,५०० …….अडीच हजार रुपये .. २०२३….२६,००० …….साडे तीन हजार रुपये

२०२४ …..२९,००० …….तीन हजार रुपये …. २०२५ ….३१,००० ……दोन हजार रुपये … २०२६ ….३३०००…..दोन हजार रुपये ….

* मागील वर्षाच्या तुलनेत वाढ : २,००० रुपये (६.४५ टक्के)

* २०१९-२० च्या तुलनेत वाढ : १७,५०० रुपये (११२.९ टक्के)

* एकूण लाभार्थी : ९३,५०९ एकूण ८८,७५६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळणार आहे. याशिवाय २,३९३ सामाजिक आरोग्य स्वयंसेविका आणि २,३६० बालवाडी शिक्षिका व मदतनीस अशा ४,७५३ जणींना भाऊबीज भेट दिली जाणार आहे.

भरघोस वाढीची चढाओढ .. १) २०२१ मध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुदानात २५०० रुपयांची वाढ केली होती. करोनामध्ये चांगले काम केल्याचे बक्षीस म्हणून त्यांनी ही रक्कम जाहीर केली होती. तसेच पुढील तीन वर्षांसाठी ही रक्कम जाहीर करण्यात आली होती.

२) २०२२ मध्ये राज्यात सत्तापालट झाल्यानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीचा निर्णय धुडकावून लावत आणखी साडेतीन हजार रुपयांची वाढ केली.

३) २०२३ मध्येही एकनाथ शिंदे यांनी तीन हजार रुपयांची वाढ केली.

४) २०२४ मध्ये विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी दिवाळी अनुदानाची घोषणा करण्यात आली. तेव्हाही दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली.

५) २०२५ मध्ये पालिका निवडणूकीच्या तोंडावर दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली होती.