मुंबई : बांधकामांची ठिकाणे, सोसायट्यांबाहेरील परिसर, भंगार ठेवलेल्या जागा, अडचणीच्या जागा अशा अनेक ठिकाणांची सफाई करून डास उत्पत्ती रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र नागरिकांच्या घरामध्ये होणारी डास उत्पत्ती रोखणे हे मोठे आवाहन मुंबई महानगरपालिकेसमोर आहे. जनजागृती करूनही अनेक ठिकाणी नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यात अडचणी येत आहेत.

पावसाळ्यामध्ये हिवताप, डेंग्यू या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. या साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येतात. मात्र या उपाययोजनांची अंमलबजावणी ही नागरिकांच्या घराबाहेर होत असते. वसाहती व घरांमध्ये तपासणी करण्यासाठी नागरिकांची परवानगी घेणे बंधनकारक असून, अनेक वसाहतींकडून तपासणीसाठी परवानगी दिली जात नाही. नागरिकांच्या घरात सजावटीसाठी लावण्यात येणारी फेंगशुई, मनी प्लँट, फुलदाणीत ठेवण्यात येणाऱ्या फुलांसाठी वापरण्यात येणारे पाणी हे अनेक दिवस बदलले जात नाही. गॅलरीतील झाडांच्या कुंड्यांखाली असलेल्या प्लेटमधील पाणी अनेक दिवस बदलले जात नाही.

हेही वाचा…मुंबई : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, मुलुंडमधील घटना

वातानुकूलित यंत्रातील पाण्यासाठी ठेवलेल्या भांड्यातील पाणी दोन दिवसातून रिकामी करणे आवश्यक असते. मात्र त्याकडे नागरिक दुर्लक्ष करतात. तसेच घरामध्ये पाणी साठवण्यासाठी वापरण्यात येणारे ड्रम वेळोवेळी साफ करणे, त्यातील पाणी झाकून ठेवणे, फ्रिजच्या मागील भागातील पाण्याच्या भांड्यातील पाणी वेळोवेळी साफ करणे, छतावर, गच्चीवर ठेवलेले सामान, टायर पावासाळ्यापूर्वी काढून टाकणे आवश्यक असते. मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे पावसाळ्यात त्यात पाणी साचते. घरात व सोसायट्यांमध्ये डेंग्यू पसरवणाऱ्या एडीस जातीच्या डासाची उत्पत्ती होऊन डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो . मात्र पालिका कर्मचाऱ्यांना घर व सोसायटीतील या बाबींची तपासणी करण्यास नागरिक परवानगी देत नाहीत. त्यामुळे अडगळीतील वस्तू निष्कासित करणे, पाण्याच्या टाक्या, टायर, पेट्री प्लेट्स, फेंगशुई झाडे, मनी प्लांट इत्यादी ठिकाणीही तपासणी करण्यात आणि डासांच्या अळ्या असल्यास त्याचे निर्मुलन करण्यात अडचणी येतात. परिणामी घरातील डासांची उत्पत्ती रोखणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसमोर एक मोठे आव्हान असते, अशी माहिती कीटकनाशक विभागातील अधिकारी चेतन चौबळ यांनी दिली.

हेही वाचा…मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ निकाल प्रकरणाला नवे वळण, ठाकरे गटाचे विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल

जनजागृतीवर दिला जातो भर

सोसायट्यांकडून परवानगी मिळत नसल्याने आम्ही नागरिकांपर्यंत ही माहिती पोहचावी यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात जनजागृती करतो. झोपडपट्टी, गृहनिर्माण संस्था व चाळींमध्ये भित्तीपत्रके, फलक, माहितीपटाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जातो, असेही चौबळ यांनी सांगितले.