एकेकाळी तब्बल ९१ हजार कोटींवर असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुदतठेवी सध्या ८१ हजार कोटींवर आल्या आहेत. या मुदतठेवीतून प्रकल्पांसाठी निधी खर्च करण्याची प्रथा यावेळीही कायम असून एकूण २८,०६० कोटी या मुदतठेवीतून उचलले जाणार आहेत. त्यापैकी १३,७६५ कोटी हे तात्पुरते अंतर्गत कर्ज म्हणून घेतले जाणार आहेत तर १४,२९५ कोटी रुपये प्रकल्पांसाठी वापरले जाणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या मुदतठेवी हा नेहमीच उत्सुकतेचा आणि आकर्षणाचा विषय असतो. यावेळी पालिका निवडणूकीच्या तोंडावर या मुदतठेवी पुन्हा एकदा चर्चेत आल्या होत्या. मुदतठेवी चाटायच्या आहेत का असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या मुदतठेवीवरूनही निवडणूकीच्यावेळी राजकारण झाले होते.
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर पालिकेच्या मुदतठेवी आता किती आहेत याबाबत राजकीय वर्तुळात आणि मुंबईकरांमध्ये उत्सुकता असते. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजातील आकडेवारीनुसार जानेवारी २०२६ अखेरीस ८१,४४९ कोटी रुपये पालिकेच्या मुदतठेवी आहेत.
पालिकेच्या विविध विभागांच्या अधिशेष रकमेच्या मुदतठेवी विविध बँकांमध्ये असतात. विविध बँकांचे व्याजदर मागवून सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांमध्ये या ठेवी गुंतवल्या आहेत. त्या मुदतठेवींवरून पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येत असतो. पालिकेच्या या मुदत ठेवीमधूनच आस्थापना खर्च व निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी दिली जात असतात. तसेच विविध विकासकामांसाठी कंत्रादारांकडून घेतलेल्या अनामत रकमांचा या ठेवीमध्ये समावेश असतो.
करोना काळानंतर बांधकामाच्या अधिमूल्यात सवलत देण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांधकाम क्षेत्राला चालना मिळाली व पालिकेला मार्च २०२२ मध्ये १४ हजार ७५० कोटींचा महसूल मिळाला होता. त्यामुळे पालिकेच्या मुदतठेवी मार्च २०२२ मध्ये तब्बल ९१ हजार कोटींच्या पुढे गेल्या होत्या. मात्र त्यानंतर या मुदतठेवींना उतरती कळा लागली आहे. तर जून २०२५ मध्ये या मुदतठेवी ८०,७४० कोटींवर आल्या आहेत. तर आता या मुदतठेवी ८१ हजार कोटींवर आल्या आहेत.
कसे आणि किती निधी घेणार ….
एकूण ८१ हजार कोटींच्या मुदतठेवीपैकी ३६,६२३ कोटी हे प्रकल्पांसाठी राखीव ठेवलेले आहेत. त्यापैकी १४,२९५ कोटी या प्रकल्पांसाठी वापरले जाणार असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे.
तर आस्थापना खर्च व निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी असलेल्या ४४ हजार कोटींच्या राखीव निधीतून १३,७६५ कोटी हे तात्पुरते अंतर्गत कर्ज म्हणून घेतले जाणार आहे. उत्पन्न जसे येईल तसे हे कर्ज पुन्हा मुदतठेवीत गुंतवले जाणार आहे. त्यामुळे हा खर्च तात्पुरता असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
एकूण मुदतठेवी ….८१,४४९ कोटी
तात्पुरते अंतर्गत कर्ज …..१३,७६५ कोटी
राखीव निधीतून प्रकल्पांसाठी खर्च …१४,२९५ कोटी

