मुंबई: मुंबई महापालिकेच्या मालकीच्या विविध गाड्या, रुग्णवाहिका, अधिकाऱ्यांच्या गाड्या, अतिक्रमण निर्मूलनच्या गाड्या याकरीता वाहनचालक मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने बेस्टचे कायमस्वरुपी तत्वावरील वाहनचालक उसनवारीने घेण्याचे ठरवले आहे. एक वर्षांकरीता १९० बसचालक महापालिकेच्यावतीने उसने घेतले जाणार आहेत. या वाहनचालकांच्या पगाराचा आणि अतिकालिक भत्ता या पोटी ३० कोटींचा खर्च महापालिका करणार आहे. बेस्टमध्ये कंत्राटी बसचालक असल्यामुळे बेस्टच्या चालकांकडे सध्या कामे नाहीत त्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीमध्ये याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला.
मुंबई महापालिकेच्या शहर, पूर्व व पश्चिम उपनगरातील विभाग कार्यालये, रुग्णालये, उद्याने, अतिक्रमण निर्मूलन या खात्यांना मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या परिवहन विभागामार्फत वाहने पुरवली जातात. त्यात कचरागाड्या, मलनिस्सारण वाहने, ट्रक, रुग्णवाहिका, शववाहिका, श्वान वाहने आदी वाहनसेवा दिल्या जातात. तसेच महापाालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, समित्यांचे अध्यक्ष यांनाही वाहने पुरवली जातात. मात्र वाहनांच्या तुलनेत वाहनचालकांची संख्या कमी असल्यामुळे या वाहनसेवा पुरवताना मुंबई महापालिकेला अडचणींचा सामना करावा लागतो. अशी वाहनसेवा सुरळीत ठेवण्यासाठी पालिकेकडे असलेल्या वाहनचालकांना अतिकालीन वेळेत काम करून घ्यावे लागते.
वाहनचालकांच्या कमतरतेमुळे वाहनसेवांचा पुरवठा अनियमित होतो. त्यामुळे मुंबई महापालिकेने बेस्ट उपक्रमाकडून १९० वाहनचालक एक वर्षाकरीता उसनवारीने घेण्याचे ठरवले आहे. पालिकेच्या गरजेनुसार ही सेवा दोन वर्षांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. तसेच बेस्ट उपक्रमाच्या गरजेनुसार आवश्यक तेव्हा १५ दिवसांची पूर्वसूचना देऊन रद्द करून संबंधित बसचालकांना परत बोलवण्याचा अधिकार बेस्ट उपक्रमाला असेल.
चालकांचा पगार दीड लाखापर्यंत जाणार ….
बेस्टने याबाबत पालिका प्रशासनाला अटी व शर्तीसह वाहन चालकाच्या सरासरी वेतन संरचनेबाबत व अतिकालिक भत्ता परिगण करून प्रस्ताव पाठवला आहे. त्यानुसार बेस्टकडून वाहनचालक घेतल्यास प्रति वाहनचालक प्रतिमाह सरासरी वेतन ८४,०३४ रुपये अधिक अतिकालिक भत्ता असा खर्च करावा लागणार आहे. तसेच वाहनचालकाने अतिकालिक काम (ओव्हरटाईम) केल्यास प्रति तास ४५१ रुपये याप्रमाणे मासिक १०० तासांकरीता ४५ हजार रुपये प्रति वाहनचालक असा खर्च येणार आहे. त्यामुळे एका वाहनचालकाचा पगार १ लाख २९ हजारावर जाणार आहे. त्यामुळे १९० वाहनचालकांसाठी पालिकेला प्रत्येक महिन्याला २ कोटी ४८ हजार असा खर्च येणार असून वर्षाला ३० कोटी ६२ हजार रुपये खर्च येणार आहे.
भरती प्रक्रियेतूनही चालक मिळेना …
दरम्यान, सन २०२४-२५ मध्ये खात्यांतर्गत ७२३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यावेळी फक्त १२४ वाहनचालक उपलब्ध झाले होते. उपलब्ध झालेल्या वाहनचालकांचे प्रमाण हे अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी आहे. सध्या एकूण रिक्त पदांपाकी ४७३ पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती प्रक्रिया पूर्ण होण्यास ८ ते १० महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात हे वाहनचालक घेतले जाणार आहेत.
