मुंबई : मुंबई महापालिकेच्या आठ रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी तीन वर्षांसाठी एकाच कंपनीला कंत्राट देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने बुधवारी फेटाळला. या कंत्राटात ४५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला होता. त्यातच स्थायी समितीच्या मंजूरीपूर्वीच काही रुग्णालयांमध्ये कामाला सुरूवातही झाली आहे. त्यामुळे स्थायी समितीला गृहित धरू नका असा इशारा देत स्थायी समिती अध्यक्षांनी याबाबतचा प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवला.
मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, नायर, कूपर या प्रमुख रुग्णालयांसह भगवती, अगरवाल, जोगेश्वरी ट्रॉमा, नायर दंत या रुग्णालयांमधील स्वच्छतेचे तब्बल १०१ कोटींचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीमध्ये मंजूरीसाठी आला होता. एकाच कंपनीला आठही रुग्णालयांच्या स्वच्छतेचे काम देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी चर्चेला आला असता सर्व पक्षीय सदस्यांनी त्या प्रस्तावाला विरोध केला. प्रस्ताव मंजूरीसाठी आलेला असताना काही रुग्णालयांमध्ये आधीच मार्च महिन्यातच कामाला सुरुवात झाली असल्याचा आरोप आरोग्य समिती अध्यक्ष हरिश भांदिर्गे यांनी केला. तर प्रशासन अजूनही प्रशासक असल्यासारखे वागत आहे का असा सवाल शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या श्रद्धा जाधव यांनी उपस्थित केला.
अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश
सदस्यांनी केलेल्या चर्चेनंतर अध्यक्ष प्रभाकर शिंदे म्हणाले की, स्थायी समितीला प्रशासनाने गृहित धरू नका. स्थायी समितीच्या मंजूरीआधीच काही रुग्णालयांमध्ये काम सुरू कसे झाले याची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात अधिकारी आणि कंत्राटदारांचे संगनमत झाल्याचे आरोप सदस्यांनी केले आहेत. त्यामुळे या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले.
कंत्राटदार मेहेरबान ….
प्रशासनाने ज्या कंत्राटदाराची शिफारस केली आहे त्याने अंदाजित खर्चापेक्षा २०% पेक्षा कमी दराने बोली लावली आहे. तसेच कामगार व पर्यवेक्षकांसाठी ग्रॅच्युइटी, सेवा शुल्क आणि सुरक्षा साहित्य यांसारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये “शून्य” दर दाखवला आहे. दैनंदिन स्वच्छता साहित्य जसे की जंतुनाशके, डिटर्जंट, साबण, ब्रश, झाडू इत्यादींसाठीही शून्य खर्च दाखवला आहे. तसेच या कंपनीने आठ रुग्णालयांच्या एकूण ४१ लाख चौरस फूट क्षेत्रफळाची स्वच्छता करण्याची जबाबदारी घेतली आहे. ज्यामध्ये ८०० शौचालये आहेत. कोणत्याही स्वच्छता साहित्याशिवाय आणि खर्चाशिवाय हे काम केले जाणार आहे. त्यामुळे हे काम कसे केले जाणार आहे याबाबतही सदस्यांनी आक्षेप घेतले.
कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप …
मात्र या कंत्राटात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी स्थायी समिती बैठकीच्या पूर्वसंध्येलाच केला. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली असून, निविदा प्रक्रियेत संगनमत करून फेरफार झाल्याचा आरोप केला आहे. ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणीही कोटेचा यांनी केली आहे.
