मुंबईतील रस्त्यांची चाळण; पालिकेच्या लेखी केवळ ५०० खड्डे

मुंबई : मुंबईतील रस्त्यांवरील प्रवास खड्डेमुक्त व्हावा, यासाठी गतवर्षी मोठय़ा प्रमाणात मोहीम राबवणाऱ्या मुंबई महापालिकेचे यंदा मात्र, खड्डय़ांकडे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दोन-तीन आठवडय़ांतील पावसामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली असून पालिकेने अलीकडेच बांधलेल्या रस्त्यांवरही खड्डे पडल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पालिकेने मात्र, आपल्या अ‍ॅपवर येणाऱ्या तक्रारींचा हवाला देत शहरात केवळ ५०० खड्डे असल्याचा दावा केला आहे.

गेल्या वर्षी पालिकेने ‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ अशी अनोखी योजनाही राबवली. यंदा टाळेबंदीमुळे आधीच रस्त्यावरील वाहतूक तुलनेत कमी आहे; पण खड्डय़ांच्या तक्रारी होतच आहेत. खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने या वर्षी ११५० टन कोल्डमिक्स विभाग कार्यालयांमध्ये वितरित केले आणि तक्रारी ताबडतोब मार्गी लावण्याबाबत सूचना दिल्या. गरज लागल्यास आणखी कोल्डमिक्स दिले जाईल, अशी माहिती रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. असे असतानाही शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे कायम आहेत.

गोवंडीतील मानखुर्द लिंक रोडवर मोठय़ा प्रमाणावर खड्डे आहेत. दादर सर्कल येथील पालिकेच्या कार्यालयासमोरील रस्त्यावरच मोठमोठे खड्डे असून या खोल खड्डय़ांमध्ये चारचाकी वाहनेही अडकून पडत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. माटुंगा स्थानक, माझगाव लवलेन, शीव-धारावी मार्गावरही हीच परिस्थिती आहे. पालिकेने अलीकडेच वाहतुकीला खुल्या केलेल्या जुहू पुलावरही खड्डे पडल्याने रस्त्याच्या बांधकामावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

गेल्या वर्षी मोहिमेदरम्यान पालिकेने २४ तासांत खड्डे बुजवण्याचा सपाटा लावला होता. या वर्षी मात्र एकेक खड्डा बुजवायला तीन दिवस लागत असल्याची तक्रोर सामाजिक कार्यकर्त्यांनी के ली. करोनामुळे सध्या पालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्याचे कारण याकरिता पालिका अधिकाऱ्यांमार्फत दिले जाते.

डागडुजी तकलादू

‘पॉटहोल वॉरियर’ सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते मुश्ताक अन्सारी दरवर्षी रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कामे करतात. गेल्या दोन वर्षांत त्यांनी ३८७ खड्डे भरले. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत खड्डय़ांची संख्या कमी झाली असली तरी अजूनही अनेक ठिकाणी खड्डे आहेत. खड्डे बुजवण्यासाठी जे मिश्रण वापरले जात आहे ते दुसऱ्या पावसात निघून जाते, असे ते सांगतात.

केवळ ५२० तक्रारी

खड्डय़ांची तक्रार स्वीकारण्याकरिता पालिकेने मोबाइल अ‍ॅप सुरू के ले आहे. यावर रस्त्यावरील खड्डय़ांची छायाचित्रे काढून अपलोड करता येतात. यावर आतापर्यंत ५२० तक्रारी आल्या असून ३८४ खड्डे बुजवण्यात आल्याचे सांगण्यात आले. पालिकेने तक्रारीसाठी २४ विभागांसाठी रस्ते अभियंत्यांचे व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर केले आहेत. त्याचबरोबर १८००२२१२९३ या मोफत मदत क्रमांकावरही तोंडी तक्रार करता येते.

खड्डय़ांच्या तक्रारी आल्या, की ते लगेचच बुजवण्यात येत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत खड्डे नक्कीच कमी आहेत. धारावीत जिथे खूप खड्डे आहेत तिथे सध्या तात्पुरती वाहतूकयोग्य दुरुस्ती करण्यात येत आहे. मात्र रस्त्याचे काम ऑक्टोबरमध्ये हाती घेण्यात येईल.

– संजय दराडे, संचालक (पायाभूत सुविधा)