मुंबई : कुलाबा परिसरातील फेरीवाल्यांविरोधात कारवाई न केल्यास विभाग कार्यालयासमोरच दुकाने थाटण्याचा इशारा रहिवाशांनी दिल्यानंतर चारच दिवसात मुंबई महापालिका प्रशासनाने चारच दिवसांत या परिसरातील फेरीवाल्यांना हटवले आहे. मुंबई महापालिकेने बुधवारी केलेल्या मोठ्या कारवाईत एकूण ६७ फेरीवाल्यांना हटवण्यात आले.
गेल्या काही वर्षांत मुंबईत सर्वच ठिकाणी फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ झाली असून फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी रहिवासी करू लागले आहेत. कुलाबा परिसरातील नागरिकांनी मुंबई महापालिकेला कुलाबा कॉजवे परिसरातील फेरीवाले हटवण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. २ नोव्हेंबर रोजी पालिकेच्या ए विभाग कार्यालयाला पत्र पाठवून सात दिवसात फेरीवाल्यांना हटवले नाही, तर विभाग कार्यालयासमोर दुकाने थाटण्याचा इशारा रहिवाशांनी दिला होता. त्यानंतर अवघ्या तीन – चार दिवसातच मुंबई महापालिकेने कुलाबा कॉजवे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे.
मुंबई महापालिकेत्या फेरीवाला धोरणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मुंबईत फेरीवाल्यांची संख्या बेसुमार वाढली आहे. खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या कुलाबा कॉजवे परिसरात गेल्या काही महिन्यांत फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. गेल्या काही महिन्यांत अनधिकृत स्टॉल्सची संख्या झपाट्याने वाढली आहे आणि त्यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालण्यास जागाच उरलेली नाही. त्यामुळे कुलाबा कॉजवे परिसरातील बेकायदेशीर स्टॉल्स आणि अतिक्रमणे एका आठवड्यात हटवण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली होती. भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली कुलाबा येथील रहिवाशांनी मुंबई महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून सात दिवसांची मुदत दिली होती.
कुलाबा कॉजवे परिसरातील ५० टक्क्यांहून अधिक स्टॉल्स बेकायदेशीर आहेत आणि अतिक्रमणांमुळे पदपथावरून चालणे मुश्कील झाले आहे. अधिकाऱ्यांनी या बेकायदेशीर फेरीवाल्यांविरोधात सात दिवसांत कारवाई केली नाही, तर विभाग कार्यालयासमोर दुकाने थाटण्यात येतील, असा इशारा रहिवाशांनी पत्रात दिला होता. त्यामुळे पालिका प्रशासनाने कुलाबा कॉजवे परिसरातील फेरीवाल्यांविरोधात मोठी कारवाई हाती घेतली आहे. या कारवाईदरम्यान वाहतुकीस, तसेच पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या कुलाबा कॉजवे परिसरातील एकूण ६७ अनधिकृत फेरीवाल्यांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागाने ही कारवाई केली.
कुलाबा कॉजवे परिसर गेट वे ऑफ इंडियापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. या परिसरात कपडे, आधुनिक दागिने, गॉगल, चप्पल, पर्स आदींच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. त्यामुळे संपूर्ण पदपथ फेरीवाल्यांनी आणि ग्राहकांनी व्यापलेला असतो. पादचाऱ्यांना चालायलाही येथे जागा नसते.
