मुंबई : मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद करण्यासाठी तत्काळ मोहीम राबवावी असे निर्देश राज्य सरकारने दिल्यानंतर पहिल्याच दिवशी मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांनी कारवाईला सुरुवात केली. दादर पश्चिम येथील सुप्रसिद्ध कबुतरखान्यावर पालिकेच्या जी उत्तर विभागाने शुक्रवारी सकाळी कारवाई करून अनधिकृत बांधकाम आणि कबुतरांना दिले जाणारे खाद्य हटवले.

मुंबईतील कबुतरखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे फुप्फुसांचे आजार होत असून या आजारामुळे अनेकांचा मृत्यूही झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून होत असलेल्या या तक्रारीची राज्य सरकारने दखल घेतली आहे. पावसाळी अधिवेशनात याबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर कबुतरखान्यांवर महापालिकेने कारवाई करावी असे निर्देश सरकारच्यावतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत गुरुवारी दिले. त्यामुळे मुंबई महापालिकेने शुक्रवारपासून आपल्या हद्दीतील कबुतरखान्यांवर कारवाई सुरू केली.

दादर पश्चिमेला असलेला सुप्रसिद्ध कबुतरखाना हा मुंबईची ओळख आहे. हा परिसर दादर कबुतरखाना म्हणून ओळखला जातो. पुरातन म्हणून या कबुतरखान्याची ओळख आहे. मात्र हा कबुतरखाना हटवावा अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरू लागली होती. काही महिन्यांपूर्वीही या मागणीने जोर धरला होता. मात्र त्यावर पुढे काही झाले नव्हते. आता राज्य सरकारनेच निर्देश दिल्यामुळे पालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाने शुक्रवारी सकाळपासूनच या कबुतरखान्यावर कारवाई सुरू केली. याबाबत सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी सांगितले की, दादरच्या कबुतरखान्याचा मूळ ढाचा हा पुरातन आहे. मात्र त्याभोवती गेल्या काही वर्षात उभे राहिलेले अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोरेगाव, मालाडमध्ये सर्वाधिक कबुतरखाने

मुंबईत ५१ कबुतरखाने असून सर्वाधिक कबुतरखाने गोरेगाव, मालाडमध्ये आहेत. गोरेगाव आणि मालाडमध्ये प्रत्येकी पाच कबुतरखाने आहेत. तर कुर्ला, चेंबूर, गोवंडी, मुलुंड, गिरगाव, मुंबादेवी, मशीद बंदर या परिसरात एकही अधिकृत कबुतरखाना नाही.