मुंबई : मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती सुरू असून महापालिका प्रशासनाने या भरतीसाठी घातलेल्या जाचक अटी अद्याप शिथिल केलेल्या नाहीत. इयत्ता बारावी आणि पदवी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याची अट काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. पालिका प्रशासनाने उमेदवारांकडून बारावी व पदवी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्रही मागितले आहे. हे प्रमाणपत्र जोडल्याशिवाय अर्जच स्वीकारला जात नसल्याने अनेकजण वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती सुरू आहे. या पदभरतीच्या पात्रता अटींवर उमेदवारांनी व विविध कामगार संघटनांनी आक्षेप घेतला आहे. ‘कार्यकारी सहायक’ (लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरली जाणार आहेत. या जागांसाठी २० ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. एवढ्या मोठ्या भरतीसाठी राज्यभरातून उमेदवार अर्ज करीत आहेत. मात्र या पदासाठीच्या पात्रतेच्या अटी जाचक असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. जाचक अटींमुळे अनेक उमेदवार या पदभरतीपासून वंचित राहणार असल्याचा आरोप करीत या अटी रद्द कराव्या अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. मात्र प्रशासनाने या अटी तशाच ठेवल्या आहेत. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याकरीत उमेदवार बारावी आणि पदवी परीक्षेत पहिल्या प्रयत्नात किमान ४५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. या अटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. तसेच पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अर्ज भरतानाच सादर करावे लागत असल्यामुळे अनेक उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जात नसल्याची माहिती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विठ्ठल बडे यांनी दिली.

हेही वाचा – मुंबई : अटल सेतूवरून ५० लाख वाहने धावली, सात महिन्यांत गाठला ५० लाखांचा टप्पा

हेही वाचा – मुंबई : चिराबाजारात संरक्षक भिंत पडून दोन मृत्यू, एक जखमी

महाराष्ट्रात आतापर्यंत कोणत्याही लिपिक पदासाठी अशी अट घालण्यात आलेली नाही. यूपीएससी, एमपीएससी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेत अशी अट कधीच नव्हती, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच अन्य भरती प्रक्रियांमध्ये कोणतीही प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी उमेदवारांना पुरेसा कालावधी दिला जातो. इथे जाचक अट असताना त्याची प्रमाणपत्रेही अर्ज भरतानाच जोडण्याची सक्ती आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांना अर्जही भरता येणार नाही, असेही बडे यांनी सांगितले. अनेक उमेदवारांना आपापल्या शिक्षण संस्थांमधून असे प्रमाणपत्र मिळवणे अशक्य आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने ही अट रद्द करावी, अशी मागणी बडे यांनी पुन्हा एकदा केली आहे.