मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारीला निवडणूक होत असून नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर आणि वैधानिक, विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी नव्या कोऱ्या गाड्या घेण्यात येणार आहेत. महापौरांसाठी इनोव्हा आणि उपमहापौर व समिती अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ गाड्या घेण्यात येणार आहेत. त्याकरीता मुंबई महापालिका तब्बल २ कोटी १६ लाख रुपये खर्च करणार आहे. लवकरच या गाड्या महापौर आणि समिती अध्यक्षांच्या दिमतीसाठी पालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
तब्बल चार वर्षांच्या कालावधीनंतर मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडली असून निवडून आलेल्या नगरसेवकांमधून येत्या ११ फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार आहे. त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये वैधानिक समित्या व विशेष समित्यांची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेला पुन्हा एकदा महापौर आणि विशेष समित्यांचे अध्यक्ष मिळतील. या सर्वांना कामकाजानिमित्त प्रवास करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून गाड्या देण्यात येतात. त्यानुसार महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाअंतर्गत असलेल्या परिवहन विभागाच्या माध्यमातून या सर्वांसाठी नवीन गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत.
एकूण १३ गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. महापौरांसाठी एक इनोव्हा गाडी, तर उपमहापौर, स्थायी, शिक्षण, सुधार समिती या वैधानिक समित्यांचे अध्यक्ष, बाजार समिती, महिला बाल कल्याण समिती, उद्यान समिती, विधी समिती, आरोग्य समिती या विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ गाड्या घेण्यात येणार आहेत. यापैकी इनोव्हा गाडीची किंमत ३० लाख रुपये असून एका स्कॉर्पिओची किंमत १८ लाख रुपये आहे. असा एकूण २ कोटी १६ लाख रुपये खर्च या गाड्यांवर करण्यात येणार आहे. तर प्रभाग समिती अध्यक्षांसाठी भाड्याने गाड्या घेण्यात येणार आहेत.
भगवी पट्टी
या गाड्यांवर मुंबई महापालिकेचे बोधचिन्ह, पद यांचा उल्लेख असेल. त्याचे संरेखन तयार करण्याचे काम सुरू असून त्यात विविध रंगांचा वापर करण्यात आला आहे. पालिकेच्या उपायुक्तांच्या गाड्यांवर सफेद रंगाची पट्टी, तर सहाय्यक आयुक्तांच्या गाड्यांवर लाल पट्टी आणि महापौर व अध्यक्षांच्या गाड्यांवर भगव्या रंगाची पट्टी असणार आहे. भगव्या रंगाच्या पट्ट्या हा परिवहन विभागाच्या दृष्टीने वर्गीकरणाचा भाग असला तरी या रंगावरून राजकारण होण्याची शक्यता आहे.

