मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल, वरळी सी फेस शाळा आणि पूनमनगर सीबीएसई शाळा या दोन शाळांना देशातील अव्वल दहा सरकारी शाळांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

शिक्षण क्षेत्राशी निगडित संकेतस्थळाने देशभरातील सरकारी शाळांचे ऑनलाइन सर्वेक्षण करून ही यादी जाहीर केली आहे. वरळी येथील पब्लिक स्कूल वरळी सी फेस शाळा व जोगेश्वरी येथील मुंबई पब्लिक स्कूल पूनमनगर सीबीएसई अभ्यासक्रम शाळा अशा या दोन शाळा ‘एज्युकेशन वर्ल्ड स्कूल रँकिंग ऑफ गव्हन्र्मेंट स्कूल्स इन इंडिया’ २०२१-२०२२ या उपक्रमांतर्गत ऑगस्ट २०२१ मध्ये आयोजित सर्वेक्षणामध्ये सहभागी झाल्या होत्या.

सर्वेक्षणामध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर विविध शाळांची सखोल परीक्षणाअंती निवड करण्यात आली. त्यामध्ये मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी फेस मनपा शाळेसाठी राज्यस्तरीय प्रथम क्रमांक व राष्ट्रीय स्तरावर पाचव्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच मुंबई पब्लिक स्कूल पूनमनगर सीबीएसई अभ्यासक्रम शाळेस राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक व राष्ट्रीय स्तरावर दहावे मानांकन प्राप्त झाले आहे.

या यशाबद्दल मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त  इकबाल सिंह चहल यांनी या शाळांचे कौतुक केले.

सर्वेक्षणाचे मुद्दे

शिक्षकांचा अध्यापन दर्जा व क्षमता, शाळा इमारत, भौतिक सुविधा, अध्यापन कृती, विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी उपक्रम, सह शालेय उपक्रम, ऑनलाइन पद्धतीने अध्यापन, मुख्याध्यापकांचे नेतृत्व गुण, पालकांचा सहभाग या सर्व मुद्यांचा सर्वेक्षणामध्ये समावेश होता.