मुंबई: घाटकोपर येथील छेडानगर परिसरात महाकाय फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला असला तरी या ठिकाणी भंगार साहित्य, डेब्रीज, राडारोडा अद्याप तसाच पडून आहे. पेट्रोल पंपाच्या ठिकाणी हे साहित्य साठवून ठेवण्यात आल्यामुळे या ठिकाणी पावसाचे पाणी साचून परिसर अस्वच्छ झाला आहे. त्यामुळे हा राडारोडा हटवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने रेल्वे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
घाटकोपर येथील छेडानगर परिसरात गेल्यावर्षी १३ मे २०२४ रोजी सायंकाळी महाकाय जाहिरात फलक कोसळून दुर्घटना घडली. १२० फूट लांब आणि १२० फुट रूंदीचा जाहिरात फलक वाऱ्याच्या वेगामुळे जवळच असणा-या पेट्रोल पंपाच्या छतावर कोसळला. या फलकाच्या खाली अनेक जण गाडले गेले, अनेक गाड्यांचा चुराडा झाला. या दुघटनेत १४ जण मृत्यूमुखी पडले तर सुमारे ७५ जण जखमी झाले. या भयंकर दुर्घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरून गेली होती. या दुर्घटनेला एक वर्ष उलटून गेले तरी या ठिकाणचा राडारोडा, फकाचा लोखंडी सांगाडा, भंगार साहित्य अद्याप हटवलेले नाही. या प्रकरणी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र लिहून हा राडारोडा हटवण्याची विनंती केली होती. पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, या घटनेला १ वर्ष उलटून देखील या ठिकाणी होर्डीगचा कचरा, डेब्रीज, भंगार जैसे थे अवस्थेमध्ये पडलेला आहे. पावसामुळे या साठलेल्या डेब्रिज व कचऱ्यामुळे या भागात डास मच्छरांची पैदास ही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे व नागरीकांना नाहक त्रासला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा राडारोडा हटवून ही जागा स्वच्छ करून किटकनाशक फवारणी करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती संजय दीना पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, याबाबत पालिकेच्या एन विभागचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हा राडारोडा ज्या ठिकाणी ठेवला आहे ती रेल्वेची जागा आहे. त्यामुळे राडारोडा हटवण्यासाठी रेल्वे पोलिसांना पत्र लिहीले आहे. तसेच पालिकेला किटक फवारणी करू देण्यासाठी परवानगीही मागितली असल्याचे त्यांनी सांगितले.
पालिकेच्या कीटन नियंत्रण विभागातर्फे घाटकोपर पंतनगर येथील राखीव पोलीस उपनिरिक्षकांना पत्र पाठवण्यात आले असून पेट्रोल पंपाच्या ठिकाणी या दुर्घटनेतील भंगार साहित्य पडून आहे. या भंगार साहित्यात पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती होते आहे. त्यामुळे सभोवताली असलेल्या पोलिस वसाहत तसेच रमाबाई आंबेडकर नगर परिसरात मलेरिया व डेंगी या आजारांच्या रुग्णांची संख्याही वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे हे साहित्य काढून टाकण्याची विनंती कीटक नाशक विभागाने केली आहे. मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे पालिकेच्या एन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी मंगळवारी २४ जून रोजी रेल्वे पोलिसांना पत्र लिहून तातडीने राडारोडा हटवण्याची विनंती करणारे स्मरणपत्र पाठवले आहे.