BMC Election Results Updates: विक्रोळी– भांडुपमधील मतमोजणीला विलंब होत असताना प्रभाग क्रमांक ११२ मध्ये ईव्हीएम यंत्रामध्ये झालेल्या बिघाडामुळे मतमोजणी बंद करण्यात आली. त्यामुळे सकाळी ११ वाजता मतमोजणीला सुरुवात होऊनही निकाल जाहीर करण्यात आला नाही.

भांडुपमधील सेंट झेवियर्स शाळेत करण्यात आलेल्या मतमोजणी प्रभाग ११२ मधील चार फेऱ्या आणि टपाल फेरीतील मतमोजणी पूर्ण झाली. त्यानंतर दुपारी २.३० वाजता पाचव्या फेरीतील मतमोजणी सुरू करण्यात आली. त्याचवेळी या फेरीतील ईव्हीएम यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाला. परिणामी मतमोजणी बंद करण्यात आली.  त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी क्रमांक ११२ चा निकाल प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेतला. सकाळी मतमोजणी सुरू होऊनही निकाल जाहीर न झाल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, सेंट झेवियर्स शाळा या मतदान केंद्रावरील मतमोजणी सुरू असलेल्या प्रभाग क्रमांक १११ च्या पहिल्या फेरदरम्यान यंत्रात बिघाड झाला होता. मात्र काही काळातच यंत्र दुरुस्त करून पुढील मोजणी सुरू झाली. त्यामुळे प्रभाग क्रमांक १११ ची मतमोजणी सुरळीत झाली.