मुंबई: महापालिका निवडणुकीसाठी राबविण्यात येणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेवर काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. एका निवडणूक अधिकाराच्या प्रभाग क्षेत्रात ८ प्रभाग येत असल्याने एका एका प्रभागाची मतमोजणी केल्यास सर्व प्रभागांची मतमोजणी होण्यास २४ तासांहून अधिक काळ लागेल. अशा प्रकारे मतमोजणी झाल्यास ते लोकशाहीच्या दृष्टीने घातक ठरणार असल्याने सर्व प्रभागांची एकाच वेळी मतमोजणी घेण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून राज्य निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी राज्य निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र लिहिले आहे. मुंबई महापालिका यंदा २३ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात साधारणतः ८ प्रभागांचा समावेश आहे. मुंबईतील प्रत्येक प्रभागात किमान ४० किंवा त्याहून अधिक मतदान केंद्रे असून उपनगरांमध्ये ही संख्या आणखी जास्त आहे. अशा परिस्थितीत मतमोजणी ही वेळखाऊ प्रक्रिया ठरणे स्वाभाविक आहे. मात्र, योग्य नियोजन केल्यास सर्व निकाल काही तासांत जाहीर करता येऊ शकतात, असा काँग्रेसचा दावा आहे.
१६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार असून प्रत्येक प्रभागासाठी साधारणतः दोन टेबल उपलब्ध असतील. यामुळे एका प्रभागासाठी अंदाजे २० ते २५ मतमोजणी फेऱ्या होतील. एका प्रभागाची मतमोजणी पूर्ण होण्यासाठी किमान अडीच ते तीन तासांचा कालावधी लागेल, असा अंदाज काँग्रेसने व्यक्त केला आहे. एकामागोमाग एक अशा पद्धतीने केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. एखाद्या निर्णय अधिकाऱ्याच्या अखत्यारीतील पहिल्या प्रभागाची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या प्रभागाची मतमोजणी सुरू केली जाईल. यामुळे प्रत्येक प्रभागासाठी सरासरी तीन तास धरले तरी आठव्या प्रभागाचा निकाल येण्यासाठी २४ तासांहून अधिक कालावधी लागेल. यामुळे संपूर्ण मुंबईचे निकाल जाहीर होण्यासाठी दुसरा दिवस उजाडेल अशी शक्यता काँग्रेसकडून करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच सर्व प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू करण्यात यावी, जेणेकरून सर्व प्रभागांचे निकाल साधारणतः एकाच वेळेत किंवा काही तासांच्या फरकाने जाहीर होतील, अशी ठाम मागणी काँग्रेसने केली आहे.
