मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी अंतिम मतदार यादी मुंबई महापालिकेने जाहीर केली आहे. मुंबई एकूण १ कोटी ३ लाख मतदार असून त्यापैकी ५३ टक्के पुरुष मतदार तर ४७ टक्के स्त्री मतदार आहेत. सर्वाधिक मतदार चांदिवली परिसरातील एका प्रभागात असून कमी मतदार सायन कोळीवाडा परिसरातील प्रभागात आहेत.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदार यादी अंतिम करण्यात आली. एकूण २२७ प्रभागांची अंतिम मतदार यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. मुंबईतील एकूण मतदारांची संख्या १ कोटी ३ लाख आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदार यादी पात्र ठरवण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जात नाही. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदार यादी वापरली जाते. मात्र १ जुलै पर्यंतची विधानसभा मतदारसंघनिहाय यादी प्रभाग निहाय फोडून त्याची प्रारुप यादी जाहीर करण्यात आली होती. त्यावरील हरकती व सूचनांनंतर ही यादी आता अंतिम करण्यात आली आहे. मतदान केंद्र निहाय यादी प्रसिद्ध करण्यासाठी २७ डिसेंबरपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे.

मुंबईत एकूण १ कोटी ३ लाख मतदार आहेत. त्यापकैी ५५ लाख पुरुष मतदार आहेत. तर ४८ लाख स्त्री मतदार आहेत. तर संपूर्ण मुंबईतील एकूण तृतीयपंथी मतदारांची संख्या केवळ १०९९ आहे. सर्वाधिक तृतीयपंथी मतदार मालाडमधील प्रभाग क्रमांक ३४ मध्ये आहेत. त्यांची संख्या २८१ इतकी आहे. त्याखालोखाल घाटकोपर मधील प्रभाग क्रमांक १२४ मध्ये १११ तृतीयपंथी आहेत.

सर्वात जास्त मतदार चांदिवलीतील प्रभाग क्रमांक १६४ मध्ये आहेत. तर सर्वात कमी मतदार सायन कोळीवाडा मधील प्रभाग क्रमांक १७६ मध्ये आहेत. तर सर्वाधिक महिला मतदार बोरिवलीतील प्रभाग क्रमांक १५ मध्ये आहेत.

सर्वाधिक मतदार

  • कुर्ला एल वॉर्ड – प्रभाग क्रमांक १६४ – ६२,९४५
  • अंधेरी पूर्व – प्रभाग क्रमांक ६६ – ६१,७९९
  • अंधेरी पूर्व – प्रभाग क्रमांक ८४ – ५७,२६१

कमी मतदार

  • सायन कोळीवाडा – प्रभाग क्रमांक १७६ – ३०,७४८
  • सायन कोळीवाडा – प्रभाग क्रमांक १७६ – ३०,७८६
  • दहिसर – प्रभाग क्रमांक १ – ३१,९६१

कमी महिला मतदार

  • सायन कोळीवाडा – प्रभाग क्रमांक १७४ – १२,६०४
  • गोरेगाव – प्रभाग क्रमांक – १३,२२२

सर्वात जास्त महिला मतदार

  • बोरिवली – प्रभाग क्रमांक १५ – ३०,०८८
  • अंधेरी पश्चिम – प्रभाग क्रमांक ६६ – ३०,०४७

एकूण मतदार – १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५

  • पुरुष मतदार – ५५ लाख १६ हजार ७०७
  • स्त्री मतदार – ४८ लाख २६ हजार ५०९
  • तृतीयपंथी – १०९९