मुंबई : महानगरपालिका निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) पक्षाने प्रस्थापित पक्षांना धक्का दिला आहे. मुंबईत ८ जागा एमआयएमने जिंकल्या असून वर्तुळात पूर्व उपनगरातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. अनेक प्रभागांमध्ये प्रस्थापित पक्षांचे गड उद्ध्वस्त करत एमआयएम उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.

अल्पसंख्याक मतदारांचे संघटन, समाजवादी पक्षातील फूट, औवेसी बंधूंच्या सभा, सुशिक्षित – तरुण उमेदवार आदींच्या जोरावर एमआयएमने निवडणूकीच्या रिंगणात उडी घेतली होती. प्रभाग क्रमांक १३४, १३५, १३६, १३७, १३८, १३९, १४०, १४१, १४३, १४५ मध्ये एमआयचे उमेदवार अराजकीय मुद्दे, शिक्षण, आरोग्य, भ्रष्टाचार आणि नशेच्या आहारी गेलेली तरुण पिढी हे प्रश्न घेऊन निवडणुकीत उतरले होते. पूर्व उपनगरांतील मुस्लीमबहुल भागांत समाजवादी पक्षाची मतपेढी होती. तेथे एमआयएमला यश मिळाले आहे.

दरम्यान, प्रभाग क्रमांक. १३७ मधील समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेविका आयेशा शेख आणि प्रभाग क्र.१३९ मधील अख्तर कुरेशी यांनी शिवसेना (शिंदे) गटात प्रवेश केल्याने अल्पसंख्यांक मतदारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवाय, इच्छुक उमेदवारांना उमेदवारी नाकारल्यानेही पक्षात फूट पडली होती. त्यामुळे मतदारांनी एमआयएमच्या बाजूने कौल दिल्याने म्हटले जात आहे.

या विजयामुळे पूर्व उपनगरात एमआयएमचा प्रभाव प्रमाणात वाढला आहे. दुसरीकडे, अपेक्षित निकाल हाती न आल्यामुळे प्रस्थापित पक्षांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. एमआयएमच्या या यशाकडे केवळ स्थानिक विजय म्हणून न पाहता, मुंबईच्या राजकारणातील बदलत्या प्रवाहाचे संकेत म्हणून पाहिले जात आहे. पूर्व उपनगरात मिळालेला हा कौल आगामी निवडणुकांसाठी इतर पक्षांसाठीही धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे.

सुमारे १० हजार मतांच्या फरकाने दणदणीत विजय

प्रभाग क्र. १३६ मध्ये एमआयएमचे उमेदवार जमिर कुरेशी तब्बल ९९२३ मतांच्या फरकाने विजयी झाले. प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या जमिर कुरेशी यांना एकूण १४९२१ मते मिळाली होती. तर, समाजवादी पार्टीच्या माजी नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांना ४९९८ मते मिळाली.

प्रभाग क्रमांक – विजयी उमेदवार – मते

१३४ – मेहजाबीन अतीक अहमद खान – ८४१४

१३६ – जमीर कुरेशी – १४९२१

१३७ – शमिर पटेल – ९४३६

१३८ – रोशन शेख – ७४९९

१३९ – शबाना शेख – ९९४०

१४० – विजय उबाळे – ४९४५

१४३ – शबाना काजी – ५२६४

१४५ – खैरनुसा हुसेन – ७६५३