मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील धुसफूस उघड होऊ लागली आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी, काही माजी नगरसेवकांना या निवडणुकीत अगदी थोडक्यात पराभव पत्करावा लागला. विजयाची खात्री असलेल्या तब्बल ११ प्रभागांमध्ये भाजप उमेदवारांच्या पदरी पराभव पडल्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या. या प्रभागांमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाकडून काहीच मदत मिळाली नाही, उलट विरोधी पक्षालाच मदत केल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला ८९ जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत केवळ सात जागा वाढल्यामुळे भाजपवर टीकाही झाली. या निवडणुकीतील पराभवाचे आता सर्व स्तरावरून विश्लेषण सुरू झाले आहे. या निवडणुकीत विनोद मिश्रा, उज्ज्वला मोडक, राजुल देसाई, योगिराज दाभाडकर, प्रीतम पंडागळे, महेश पारकर या माजी नगरसेवकांना अगदी थोड्या मतांमुळे पराभव पत्करावा लागला. शिवसेना (शिंदे) आणि भाजप महायुतीने एकत्र लढूनही हा पराभव झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
हा पराभव माझ्यासाठी अनपेक्षित आहे. माझ्या प्रभागात शिवसेना (शिंदे) पक्षाची काहीच ताकद नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्र लढलो असतो तर आम्हाला अधिक यश मिळाले असते.
– विनोद मिश्रा, भाजप उमेदवारवर्सोवा मतदारसंघात कोळी समाजाची मते आपल्याला मिळू शकली नाही, तसेच हा प्रभाग आपल्यासाठी नवीन होता. त्यातच शिवसेना (शिंदे) पक्षाचा एक बंडखोर उमेदवार निवडणूक लढवीत होता. त्यामुळे मते विभागली गेली. – योगिराज दाभाडकर, भाजप उमेदवार
प्रभाग क्रमांक – -विजयी उमेदवार – भाजप उमेदवार – विजयासाठी मतांचा फरक
२६ – धर्मेंद्र काळे (शिवसेना-ठाकरे) – प्रीतम पंडागळे – ९५८
४३ – अजित रावराणे (राष्ट्रवादी -शरद पवार) – विनोद मिश्रा – ४९५
५६ – लक्ष्मी भाटिया (शिवसेना -ठाकरे) – राजुल देसाई – ७३७
५९ – यशोधर फणसे (शिवसेना -ठाकरे) – योगिराज दाभाडकर – ३७३
७४ – विद्या आर्या (मनसे) – उज्ज्वला मोडक – ८१
८७ – पूजा महाडेश्वर (शिवसेना-ठाकरे) – महेश पारकर – २४२८
९९ – चिंतामणी निवाटे (शिवसेना-ठाकरे) – जितेंद्र राऊत – ३१९
१०१ – कॅरन डिमेलो (काँग्रेस) – अनुश्री घोडके – ८०४
११० – आशा कोपरकर (काँग्रेस) – जेनी शर्मा – ८५७
१६५ – अशरफ आजमी (काँग्रेस) – रुपेश पवार – ३५५
२२० – संपदा मयेकर (शिवसेना-ठाकरे) – दीपाली मालुसरे – १८८
‘स्वबळावर लढवली असती तर फायदा’
● शिवसेना (शिंदे) पक्षातील पराभूत उमेदवारांनी भाजपवर उघड-उघड आरोप केले असले तरी भाजपच्या पराभूत उमेदवारांनी मित्रपक्षांवर थेट आरोप करणे टाळले.
● मात्र शिवसेना (शिंदे) पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून काहीच मदत मिळाली नाही उलट विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदतच केल्याची कुजबुज सुरू आहे.
● काही प्रभागात काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केल्याचीही चर्चा सुरू आहे. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली असती तर अधिक फायदा झाला असता असाही सूर उमटू लागला आहे.
माझ्या प्रभागात एका महिलेला अपक्ष म्हणून उभे करण्यात आले होते. तिला आमच्याच पक्षातील काही लोकांनी आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या आमदारांनी मदत केली. या राजकारणामुळे आपले राजकीय नुकसान झाले. – उज्ज्वला मोडक, भाजप उमेदवार
